बॅण्डबाजातून अवघी १० टक्के वसुली
By admin | Published: March 22, 2016 02:12 AM2016-03-22T02:12:51+5:302016-03-22T02:12:51+5:30
पालिकेच्या कर विभागाने एकूण १९० कोटींच्या करवसुलीपैकी १० महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली केली आहे. त्यानंतर, सक्तीच्या वसुलीसाठी २६ फेब्रुवारीपासून बॅण्डबाजा वाजवत कर वसूल करण्याची संकल्पना
भार्इंदर : पालिकेच्या कर विभागाने एकूण १९० कोटींच्या करवसुलीपैकी १० महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली केली आहे. त्यानंतर, सक्तीच्या वसुलीसाठी २६ फेब्रुवारीपासून बॅण्डबाजा वाजवत कर वसूल करण्याची संकल्पना अमलात आणली. त्यातूनही २१ दिवसांत अवघी १० टक्केच वसुली झाली. पुढील थकीत वसुलीसाठी अभय योजनेऐवजी मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्याची चर्चा कर विभागात सुरू झाली आहे.
पालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या मालमत्ताकरासाठी मागील अंदाजपत्रकात १९० कोटींचे उद्दिष्ट कर विभागाला दिले होते. परंतु, कर विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान केवळ ४० टक्केच वसुली झाल्याचे उघड झाले होते. ही वसुली चिंताजनक असल्याने आयुक्त अच्युत हांगे यांनी कर विभागाला थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासह मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा आदेश दिला होता. परंतु, कर विभागाने ठाणे पालिकेच्या धर्तीवर बॅण्डबाजा घेऊन कर वसूल करण्याची संकल्पना राबवली. त्यासाठी एकूण सहा प्रभागनिहाय बॅण्ड पथकांचे नियोजन करून २६ फेब्रुवारीपासून याला सुरुवात झाली. त्याला प्रतिसाद मिळत असतानाच काही करबुडव्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बॅण्डच्या आवाजाचा त्रास होत असल्याचा कांगावा करून कर भरण्यापासून पळ काढण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याला फारसे न जुमानता कारवाई सुरू राहिली. कर विभागाच्या पथकांनी बॅण्ड वाजवून केलेल्या कारवाईत २१ दिवसांत एकूण करवसुलीत १० टक्कयांनी वाढ झाली, असे कर विभागाकडून सांगण्यात आले.