अवघ्या ५ दिवसात ‘बारवी’त क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:28+5:302021-07-25T04:33:28+5:30
बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या ...
बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास हे बारवी धरण लवकरच भरून जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.
२० जुलै रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बारवी धरण क्षेत्रातदेखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे २० जुलै रोजी धरणात ४८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला होता. तर २० जुलैनंतर सलग पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्याने बारवी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा गेल्या पाच दिवसात निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाने धरण क्षेत्रात अशीच दमदार हजेरी लावली, तर बारवी धरण १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२० जुलै रोजी बारवी धरणात ४८ टक्के पाणीसाठा होता. पाच दिवसानंतर म्हणजेच २४ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात वीस टक्के धरण भरल्याने ठाणे जिल्ह्यासाठी ही बाब समाधानाची ठरणार आहेत. धरणाची पाण्याची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर एवढी असून आजच्या घडीला २३० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.
----------------------