अवघ्या ६ महिन्यात मीरा भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्याची स्वगृही बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 01:35 PM2021-07-28T13:35:56+5:302021-07-28T13:36:23+5:30
बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल २५ वर्षां पेक्षा जास्त काळ एकाच विभागात ठाण मांडून असणारे वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची जानेवारीत पाणी पुरवठा विभागात झालेली बदली आता रद्द करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यात खांबीत यांची स्वगृही झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेले सुरेश वाकोडे यांना बांधकाम विभागात खांबित यांच्या जागी नेमण्यात आले आहे. मीरा भाईंदर नगरपरिषद असताना पासून कार्यरत दीपक खांबित हे महापालिकेतील अतिशय वजनदार अधिकारी मानले जातात. नगरसेवक, राजकारणी पासून अनेकांवर त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या विरोधात सहसा कोणी ब्र काढत नाहीत. परंतु जानेवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त डॉ विजय राठोड यांनी धाडसी निर्णय घेत खांबीत यांची बदली पाणी पुरवठा विभागात केली होती.
पाणी पुरवठा विभागात २०११ साला पासून ठाण मांडून असणारे सुरेश वाकोडे यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली होती. परंतु राठोड यांची बदली होऊन आयुक्त पदी दिलीप ढोले यांची नियुक्ती झाली. ढोले यांनी मंगळवार २७ जुलै रोजी आदेश काढून खांबीत यांची पुन्हा बांधकाम विभागात तर वाकोडे यांची पुन्हा पाणी पुरवठा विभागात बदली केली आहे. अवघ्या सहा महिन्यात खांबीत यांची पुन्हा स्वगृही झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे खांबीत यांच्या दबदब्याची प्रचिती आल्याचे मानले जाते.
या आधी पालकमंत्री असताना गणेश नाईक यांनी खांबीत यांच्या बदलीचे आदेश दिले होते . त्यावेळी त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली गेली. परंतु खांबित त्या विभागात हजरच झाले नाहीत . उलट काही दिवसातच त्यांनी बदली रद्द करून नाईक यांच्या नाकावर टिच्चून बांधकाम विभाग मिळवला . २००८ साली नगरसेवक चंद्रकांत वैती यांनी खांबित विरोधात आघाडी उघडली व सेवेतून निलंबित करण्याचा ठराव केला होता . ठराव मंजूर झाला . परंतु नंतर पुढच्या सभेत काही नगरसेवकांनी खांबित यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव केला होता .
आयुक्तांनी खांवीत व वाकोडे यांची त्यांच्या संस्थानिक विभागात पुन्हा बदली करतानाच तब्बल १५ वर्षां पेक्षा जास्त सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळणारे उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे यांना दणका दिल्याचे मानले जाते. पानपट्टेयांच्या कडून सार्वजनिक आरोग्य विभाग काढून घेत तो उपायुक्त अजित मुठे यांच्या कडे दिला आहे. तर पानपट्टे यांच्या हाती परिवहन विभागाचे स्टेअरिंग देण्यात आले आहे. तर मुठे यांच्याकडून अतिक्रमण विभाग काढून घेत नवनियुक्त उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या कडे सोपवला आहे.