नुसत्याच गप्पा : १२ वर्षांत लाेकलही वाढल्या नाहीत
By पंकज पाटील | Published: August 23, 2024 12:45 PM2024-08-23T12:45:19+5:302024-08-23T12:45:32+5:30
लोकसंख्या चार लाख झाली, लाखो प्रवाशांकरिता केवळ एक शौचालय, शाळेतील अत्याचाराचा रोष रेल्वेमार्गात प्रकटला
- पंकज पाटील
बदलापूर : बदलापूरची लोकसंख्या चार लाखांच्या आसपास झाली. लोकसंख्या केवळ एक वर्षात एक लाखाने वाढली. परंतु बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलच्या संख्येत मात्र १२ वर्षांत वाढ झालेली नाही. स्थानकातील सुविधांमध्येही गेल्या पाच वर्षांत तसूभरही वाढ झालेली नाही. त्यावरून धुमसणाऱ्या असंतोषात शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाने निर्माण झालेल्या रोषाची भर पडली आणि त्यातूनच गेल्या मंगळवारी जनक्षोभ उफाळून आला, अशी कबुली आता बदलापूरमधील रेल्वे प्रवासी देत आहेत.
गेल्या पाच वर्षांत बदलापूर शहराची लोकसंख्या कित्येक लाखांनी वाढली. मात्र, बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या लोकल फेऱ्याची संख्या येऊन जाऊन ५८ आहे. त्यात २०१२ पासून वाढ झालेली नाही, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी संजय मेस्त्री यांनी दिली. दिव्यातील लोकांनी सहा - सात वर्षांपूर्वी उद्रेकाचे दर्शन घडवल्यावर तेथे जलद लोकलला थांबा मिळाला. मात्र, बदलापूरचे प्रवासी सोशिक असल्याने त्यांना गृहीत धरले जात असल्याची खदखद प्रवाशांत होती. काही कल्याण लोकलचा प्रवास बदलापूरपर्यंत वाढवून बदलापूर लोकलची संख्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी मान्य झाली नाही.
होम प्लॅटफॉर्मचे काम अपूर्णच
बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, या प्लॅटफॉर्मचे काम अद्याप पूर्णत्त्वास गेलेले नाही. हा प्लॅटफॉर्म वापरला जात असला तरी तिथे सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.
स्थानकाकडे जाणारा मार्ग अरुंद
बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो अरुंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस स्थानकाच्या आत जाणे आणि स्थानकातून बाहेर पडणे अवघड जाते. त्यातूनही प्रवाशांच्या मनात रोष निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येते.
रिक्षाचालकांची दादागिरी
रेल्वे स्थानकात येण्यासाठी आणि स्थानकातून घराकडे जाताना रिक्षा पकडताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रिक्षा चालकांची मुजोरी वाढली आहे. मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जाते.
सरकते जिने लावले, काढले
रेल्वे स्थानकामध्ये नव्याने सरकते जिने लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला होता. मात्र, बदलापूर रेल्वे स्थानकात चुकीच्या ठिकाणी सरकते जिने लावल्यामुळे त्याचा प्रवाशांना कुठलाही लाभ झाला नाही.
प्रवासी त्या जिन्यांचा वापर करीत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमधून या सरकत्या जिन्याबाबत संताप व्यक्त होत होता. त्यामुळे लावलेले जिने रेल्वेने काही दिवसातच काढून टाकले.