अवघ्या चार तासांत मिळाले ९० हजार रुपयांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:55 PM2019-12-25T23:55:30+5:302019-12-25T23:55:36+5:30
केडीएमटीला ब्लॉक लाभदायक : ४७ बसच्या ९५ फेऱ्या
कल्याण : एकीकडे उत्पन्न आणि खर्चाच्या वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम डबघाईला आला असताना बुधवारचा रेल्वेचा चार तासांचा ब्लॉक केडीएमटी उपक्रमासाठी लाभदायक ठरला. कल्याण-डोंबिवली मार्गावर ब्लॉकच्या दरम्यान ४७ बसच्या ९५ फेºया झाल्या. त्यामुळे ९० हजारांच्या आसपास उत्पन्न उपक्रमाला मिळाले आहे.
ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी रेल्वेने बुधवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीदरम्यान चार तासांचा ब्लॉक घेतला होता. या काळात केडीएमटीने २४ बस सोडल्या होत्या. परंतु, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता बसची संख्या ४७ पर्यंत वाढवण्यात आली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यानंतर ती पूर्ववत होईपर्यंत केडीएमटीच्या ९५ फेºया झाल्या.
चार तासांच्या ब्लॉकच्या कालावधीत सहा हजार ८०० प्रवाशांनी केडीएमटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे ९० हजारांच्या आसपास उत्पन्न उपक्रमाला मिळाले आहे, अशी माहिती उपक्रमाकडून देण्यात आली.
परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांच्या आदेशानुसार आणि केडीएमटीचे व्यवस्थापक मारुती खोडके यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडून जास्तीतजास्त प्रवाशांना बसची सुविधा दिली.
सदस्यांचेही लाभले योगदान
च्केडीएमटीचे अधिकारी आणि कर्मचाºयांप्रमाणे केडीएमटी बस उपलब्ध करून देण्याच्या नियोजनात परिवहन सदस्यांचेही विशेष योगदान होते. परिवहनचे भाजपचे सदस्य संजय राणे यांनी डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात सकाळी ९ वाजल्यापासूनच उपस्थिती लावत येथील यंत्रणा कुशलतेने हाताळली. रेल्वेचा ब्लॉक संपेपर्यंत त्यांनी येथील नियोजन सांभाळले.
च्परिवहनचे सभापती मनोज चौधरी यांनी पत्रीपूल परिसरातील वाहतूककोंडी सोडविल्यानंतर बाजीप्रभू चौकात उपस्थिती लावली. त्यांच्यासह माजी सभापती सुधीर पाटील यांचाही येथे नियोजन यशस्वी करण्यात हातभार लागला. भाजपचे अन्य सदस्य दिनेश गोर हे देखील यावेळी उपस्थित होते.