अवघ्या दीड तासांमध्ये चोरटयांनी लंपास केला अडीच लाखांचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 01:11 AM2021-05-13T01:11:24+5:302021-05-13T01:13:45+5:30
कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भास्कर कॉलनीतील रहिवाशी अतुल भागवत (५२) यांच्या घराचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे ते ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी आणि दोन मुलांसह घराला लॉक लावून अन्य एक घर पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याच दरम्यान त्यांची मुलगी ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतली. त्यावेळी घराचे लॅच पूर्णपणे लावलेले नसल्याचे आढळले. तेंव्हा तिच्यासह कुटूंबीयांनी घरात पाहणी केली असता, घरातील सामानाची तसेच बेडरुममधील कपाटात ठेवलेल्या लॉकरमधील एक लाख रुपयांच्या सोन्याच्या चार बांगडया आणि सोन्याचे एक मंगळसूत्र असे दोन लाख ६० हजारांचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक एम. पी. सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.