"देशात जसं मोदी गॅरंटी चालते, तसं राज्यात नोकरीची गॅरंटी"; CM शिंदे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 11:14 AM2024-03-07T11:14:32+5:302024-03-07T11:25:57+5:30
मोदी की गॅरंटीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा ठाण्यात पार पडला
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा जाहीर भाषणात ये मोदी की गॅरंटी है.. म्हणत भारतीयांना पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी देण्याची मागणी केली. तर, अनेक विकासकामांचा दाखल देत नरेंद्र मोदी, ही मोदीची गॅरंटी आहे, काम होणारचं असे सांगताना दिसून येतात. भाजपाच्या प्रचार जाहिरातींमध्येही मोदी की गॅरंटी हा शब्दप्रयोग सातत्याने दिसून येतो. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, जसं देशात मोदींची गॅरंटी चालते, तसं राज्यात नोकरीची गॅरंटी असल्याचं म्हटलं. ठाणे येथील नमो रोजगार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोकरीची गॅरंटी दिली.
मोदी की गॅरंटीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा ठाण्यात पार पडला असून या मेळाव्याचा माध्यमातून राज्यातील तरुणांच्या हाताला काम आणि स्वयंरोजगारांच्या संधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. राज्य सरकारने ७५ हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. कौशल्य विकासाच्या माध्यमातून अजून १ लाख लोकांना काम दिले. नारीशक्ती अभियानाच्या माध्यमातून बचत गटांना बळ देऊन त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात २००० ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरू केल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वात तरुणांचा देशाला स्वयंरोजगार देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तर, पत्रकारांशी बोलताना जसं देशात मोदी की गॅरंटी आहे, तसं राज्यात नोकरीची गॅरंटी देण्यात आल्याचंही शिंदेंनी म्हटले.
दावोस येथे गतवर्षी १ कोटी ३७ हजार कोटींचे तर यावर्षी ३ लाख ३० हजार कोटींचे एमओयु करण्यात आले असून त्यामुळे अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार आहेत. उद्योग, सुरक्षा, स्वच्छता आणि परदेशी गुंतवणूक यात अग्रेसर आहे. एमटीएचएल, मिसिंग लिंक, कोस्टल रोड, समृद्धी अशा प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांचा विकास झाला असून अनेक उद्योजक महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी पहिली पसंती देत आहेत. दरम्यान, राज्यातील सरकार हे फेसबुक लाईव्ह सरकार नसून फेस टू फेस काम करणारे सरकार असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.