अवघ्या दिड तासातच ठाण्यात दोन महिलांच्या सोनसाखळयांची जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:12 PM2020-09-30T22:12:53+5:302020-09-30T22:16:33+5:30
ठाणे शहरात लुईसवाडी आणि तत्वज्ञान विद्यापीठ चौक अशा दोन ठिकाणी मंगळवारी एकाच दिवशी अवघ्या दिड तासाच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे जबरीने चोरीचे प्रकार घडले. याप्रकरणी वागळे इस्टेट आणि चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एरव्ही, दोन तीन दिवसांनी घडणारे सोनसाखळी जबरी चोरीचे प्रकार आता काही तासांवर घडू लागले आहेत. शहरात लुईसवाडी आणि तत्वज्ञान विद्यापीठ चौक अशा दोन ठिकाणी मंगळवारी एकाच दिवशी अवघ्या तासाभराच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे हिसकावण्याचे प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वागळे इस्टेट, लुईसवाडी सिद्धार्थनगर भागात राहणारी ६६वर्षीय महिला २९ सप्टेंबर रोजी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडली. ती ५.२० वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक अशोक बोरीटकर यांच्या कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन घरी परत जात होती. त्याचवेळी एका काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेले दोघेजण तिच्याजवळ येऊन थांबले. त्यांनी ‘मावशी जैन मंदिर कोठे आहे’? अशी त्यांना विचारणा केली. तेंव्हा आपल्याला जैन मंदिर माहित नसल्याचे ती सांगत असतांनाच मोटारसायकलवरील मागे बसलेल्याने तिच्या गळयातील सुमारे दोन तोळयांचे ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाले. नंतर तिला धक्का देऊन तिथून पलायन केले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा या महिलेने दाखल केला आहे.
* दुस-या घटनेत तुळशीधाम भागातील ५४ वर्षीय महिला तिच्या पतीसह रिक्षाने २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास आशापुरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पाच हजारांचे सोन्याचे पँन्डल असा ३५ हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.