ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; धन कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:06+5:302021-03-24T04:38:06+5:30
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, ...
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, त्याला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही या निवडणुकीत काम केलेले अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अशा दोन हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्तव्य बजावण्याचा केवळ मान मिळाला, पण आता धनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा सूर आहे.
जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींमधील एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींमधील ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४७९ मतदान केंद्रांवर मतदान झाले.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार ४१३ उमेदवार होते. या निवडणुकीसाठी दोन लाख ५० हजार ५०० मतदारांकरिता ४७९ मतदान केंद्रे होती. या केंद्रांवर दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि तीन हजार पोलीस तैनात होते. त्यात एक जनसंपर्क अधिकारी, तीन मतदान केंद्र अधिकारी, शिपाई आणि सुरक्षेसाठी पोलीस आदी सहा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, ते अद्याप निवडणुकीच्या कामाच्या मानधनापासून वंचित आहेत.
---------------------