आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा केवळ दिखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:12+5:302021-08-18T04:47:12+5:30
ठाणे : कोरोनामुळे तिजोरीत पैसा नसल्याचे पालिका सांगत आहे. दायित्वाचे कारणही पुढे केले जात आहे, परंतु पालिकेवर ही ...
ठाणे : कोरोनामुळे तिजोरीत पैसा नसल्याचे पालिका सांगत आहे. दायित्वाचे कारणही पुढे केले जात आहे, परंतु पालिकेवर ही वेळ आली कशी, असा सवाल करीत भाजपने तत्कालीन आयुक्तांच्या मर्जीसाठी नको त्या प्रस्तावांवर निधी खर्च केल्यानेच पालिकेवर ही वेळ ओढावल्याचे आरोप भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी मंगळवारी महासभेत केला. महापालिका आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प २,७५४ कोटींचा होता. पालिकेच्या तिजोरीत तीन महिन्यांत ७३० कोटींचे उत्पन्न प्राप्त झालेले आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याचा केवळ दिखावा केला जात असल्याचा धक्कादायक आरोप भाजपने यावेळी केला.
मंगळवारी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवकांना प्रभागात कामे करण्यासाठी नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी मिळत नसल्याने, लोकप्रतिनिधींकडून सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. अर्थसंकल्पांवर बोलताना पाटणकर यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने २ हजार ७५४ कोटींचे बजेट सादर केले. यामध्ये १७८ कोटी कोरोनावर खर्च करण्यात आले आहे. ४६८ देणी बाकी आहेत. १७० कोटी नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी, तर १,३०० कोटी आस्थापनेवर खर्च धरला, तरी १,००० कोटी शिल्लक असून, यामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, हे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. ठाणे महापालिकेच्या दायित्वामध्ये अनावश्यक प्रकल्प राबविल्यामुळेच वाढ झाल्याचे सांगत, त्यांनी तत्कालीन आयुक्तांना खूश करण्यासाठी काही प्रकल्प राबविल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनीही अर्थसंकल्पावर चर्चा करताना, केवळ विरोध करण्यापेक्षा उत्पन्नवाढीसाठी आणि कर्ज घेण्यासाठी सकारात्मक चर्चा होणे आवश्यक असल्याचे म्हणाले. कर्ज घेण्याचा जो ठराव करण्यात आला होता, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. असे अनेक प्रकल्प आहेत, जे अजूनही पूर्ण झाले नसून, त्यांची किंमत मात्र १०० ते २०० कोटींनी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आता आटोक्यात आला असल्याने कोविड रुग्णालयातील स्टाफ कमी करणे आवश्यक असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. अशा विविध उपाययोजना केल्या, तर ५० कोटींची बचत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.