अवघ्या तीन महिन्यांतच विजय सिंघल यांची उचलबांगडी, राजकीय षडयंत्राचे बळी?
By अजित मांडके | Published: June 25, 2020 12:18 AM2020-06-25T00:18:53+5:302020-06-25T00:26:49+5:30
राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- अजित मांडके
ठाणे : एकीकडे संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेत तब्बल ५ वर्षे आयुक्तपदाची धुरा सांभाळली असताना दुसरीकडे त्यांच्यानंतर आलेले विजय सिंघल यांची अवघ्या तीन महिने, तीन दिवसांत उचलबांगडी करण्यात आली. कोरोना रोखण्यात अपयश आल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याच्या चर्चा आता शहरात जोर धरूलागल्या आहेत. परंतु, दुसरीकडे राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरात कोरोनाची सुरुवात झाली आणि विजय सिंघल यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. आल्या आल्या त्यांना पालिकेची आर्थिक घडी सावरण्याचे काम करावे लागणार होते. तर कोरोनाच्या मुकाबल्यासाठी त्यांना सिंघम व्हावे लागणार होते. त्यानुसार त्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्नही केला. आरोग्य विभागात महागड्या दरात सुरू असलेल्या साहित्य खरेदीला चपराक लावून महागडे प्रस्ताव आणण्यासही नकार दिला. तसेच आरोग्य विभागातील साहित्यांची खरेदी नव्याने करावी असेही सांगितले. यातूनच प्रस्थापित अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी पडली. तर शहरातील काही बड्या राजकीय पुढाऱ्यांकडून आलेल्या वादग्रस्त प्रस्तावही त्यांनी रोखले होते. परंतु, दबाव आल्याने अखेर ते वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढावली होती. आयुक्त विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, ते काही कामाचे नाहीत, असे अनेक ठपके त्यांच्यावर जाता जात ठेवले आहेत.
असे प्रकार सुरूअसतांनाही त्यांनी आपली साखळी तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना हाताशी घेतले. तसेच आपल्या मर्जीतील एका अधिकाºयालादेखील वरिष्ठ पातळीवर दबाव टाकून ठाण्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणले होते, अशीही चर्चा होती. तसेच इतर बड्या अधिकाºयांनादेखील आणून त्यांनी ठाण्यात बैठक घेऊन येथील प्रस्थापित अधिकाºयांना धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात होते. यातूनच प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात रोजच्या रोज काही ना काही तू तू मैं मैं सुरूहोती. त्यामुळे काही प्रस्थापित अधिकाºयांनी सिंघल यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. आधीच राजकीय मंडळींचे ऐकत नसल्याने ते अडचणीत होते, त्यात प्रतिनियुक्तवर आलेल्या अधिकाºयांना हाताशी घेऊन त्यांनी आपली साखळी तयार केली होती. त्यामुळेदेखील ते नावडते झाले होते. यामुळे राजकीय मंडळी आणि काही प्रस्थापित अधिकाºयांनी एकत्र येऊन त्यांची विकेट काढल्याचे बोलले जात आहे.
>ठाणे समजून घेण्याआधीच विकेट
नवनियुक्त आयुक्ताला महापालिकेची गणिते आणि आर्थिक परिस्थिती समजून घेण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी हा लागतोच. सिंघल यांची नियुक्ती झाली त्या वेळेस कोरोना वाढत होता, तसेच महापालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठीदेखील त्यांना प्रयत्न करायचे होते. शिवाय येथील राजकीय मंडळी कशी आहेत, त्यांच्याशी कसे मिळवून घ्यायचे यासाठीही कालावधी जाणार होता. परंतु, हे समजून घेण्याआधीच त्यांची विकेट पडली.