वाहतूक नियोजनाच्या नुसत्या बाताच सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:53 AM2019-02-28T00:53:52+5:302019-02-28T00:54:06+5:30
ठाकु र्ली उड्डाणपुलावरून जीवघेणा प्रवास : अवजड वाहनांमुळे विद्यार्थी त्रस्त, अपघाताची भीती
डोंबिवली : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने नव्याने उड्डाणपूल बांधला. परंतु, पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथील वाहतूक पूर्णत: कोलमडून पडते. पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक सर्रास होत असल्याने येथील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही जिकिरीचे होते. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने वाहतूक शाखेशी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु, वाहतूक पोलिसांकडून कृतीअभावी केवळ नियोजनाच्या ‘बाता’च सुरू आहेत.
ठाकुर्ली उड्डाणपुलानजीकचे रस्ते अरुंद आहेत. तेथील इमारती जुन्या असल्याने त्यांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. या पुलावरून लहान वाहनांबरोबर ट्रक, बस, टँकर यांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे पूर्वेकडील स.वा. जोशी विद्यालयालगतच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची कोंडी होते. शनिवार-रविवार तर तासन्तास या कोंडीत वाहनचालक अडकून पडतात. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसतो. रस्त्याच्या दुतर्फा होणारे वाहनांचे पार्किंग, पदपथांवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यावरून वाहनांची सदैव वर्दळ पाहता चालायचे कसे, असा यक्षप्रश्न पादचाऱ्यांना पडतो.
स.वा. जोशी हायस्कूलच्या संकुलात एक इंग्रजी शाळा, कनिष्ठ आणि महिला महाविद्यालयही आहे. त्यात एक हजार ३०० च्या आसपास विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण होते. या त्रासाबाबत महाविद्यालय प्रशासनाने केडीएमसी व वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, वाहतूक पोलीस हालचाली होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथील व्यापारीही कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी वेळीच पावले उचलावीत, अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे व्यापारी नितीन सावला यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एन. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
रोडरोमिओंनी मांडलाय उच्छाद!
जोशी हायस्कूल परिसरात रोडरोमिओंनीही उच्छाद मांडला आहे. भरधाव गाड्या चालवून रोडरोमिओ शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार येथे सर्रास घडत आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकारही त्यांच्याकडून घडतात. यासंदर्भातही शाळा व्यवस्थापनाने रामनगर पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शाळा भरणे आणि सुटण्याच्या कालावधीत पोलिसांची गस्त वाढावी, अशी मागणी होत आहे.