चार दिवसांत ज्योती कलानी स्वगृही, ओमी कलानीही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:36 AM2019-10-04T02:36:45+5:302019-10-04T02:37:11+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम चार दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी देणाऱ्या आ. ज्योती कलानी यांनी आपली स्नुषा पंचम यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम चार दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी देणाऱ्या आ. ज्योती कलानी यांनी आपली स्नुषा पंचम यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे. ओमी कलानी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ज्योती किंवा ओमी यांच्यापैकी एकजण भाजपच्या कुमार आयलानी यांना निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देणार, हे स्पष्ट झाले आहे.
भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याने, कलानी कुटुंबातील एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ज्योती कलानी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पंचम यांना उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नसल्याने, निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार असल्याचे ओमी यांनी सांगितले.
ओमी म्हणाले की, पंचम यांना उमेदवारी मिळेल व त्यामुळे कामाला लागा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही प्रचारास सुरुवात केली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने आयलानी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गुरुवारी दुपारी कलानी समर्थकांची ‘कलानी महल’ येथे बैठक होऊन धोका देणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. कलानी कुटुंबाला तिकीट नाकारल्याची माहिती शरद पवार यांना मिळाल्यावर, त्यांनी ज्योती यांना राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढण्यास सांगितले. खुद्द ज्योती यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.
ज्योती यांनी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शुक्रवारी ओमी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. दोघांपैकी एकजण निवडणूक लढवणार, हे निश्चित असल्याची माहिती ओमी यांनी दिली.
तत्पूर्वी, ज्योती यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाने महापालिकेतील गटनेते भरत गंगोत्री यांना ‘एबी’ फॉर्म दिले होते. शुक्रवारी सकाळी ते अर्ज दाखल करणार होते. मात्र, तेवढ्यात भाजपने कलानी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने गंगोत्री यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिन्हे आहेत. ज्योती यांना उमेदवारी दिल्याची कल्पना नसल्याचे गंगोत्री म्हणाले. आयलानी शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ओमी कलानी यांची दोन्हीकडून कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने कलानी कुटुंबाला मुळात भाजपची उमेदवारीच हवी होती. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधणे परवडणार नाही, हे कलानी कुटुंबाने हेरले होते.
यावर उपाय म्हणून ओमी अपक्ष लढतील व निकालानंतर ओमी किंवा कुमार आयलानींपैकी जे कुणी विजयी होतील, ते भाजपसोबत राहू शकतील. मात्र, अपक्ष निवडणूक लढवण्यास भाजपने विरोध केला तर राष्ट्रवादीतर्फे ज्योती निवडणूक लढवतील, असे डावपेच होते. महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी यांच्याशी आघाडी करण्यापूर्वी भाजपने ओमी यांच्यावरील गुन्हे मागे घेतले व त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ओमी यांची दोन्हीकडून कोंडी झाली आहे.
भाजपने आपली फसवणूक केली असल्याने उल्हासनगर शहरवासीय भाजपला माफ करणार नाहीत. महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आम्हाला सोबत घेऊन भाजपने पहिला महापौर निवडून आणला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपच्या नेत्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत मागितल्याने आम्ही शिवसेनेला मदत केली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासन देऊनही भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही. - ज्योती कलानी