‘मुलगी नको’ ही मानसिकता समाजाने बदलण्याची गरज, ज्योती मराठे यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:09 AM2020-03-17T01:09:55+5:302020-03-17T01:12:06+5:30

समाजात मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हा प्रकार रोखला पाहिजे. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. मुलींच्या भविष्यासाठी आतापासून तरतूद करण्यास सुरुवात करा. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी अडचण येणार नाही.

Jyoti Marathe expressed the need to change the mindset of 'don't want a girl' | ‘मुलगी नको’ ही मानसिकता समाजाने बदलण्याची गरज, ज्योती मराठे यांनी व्यक्त केले मत

‘मुलगी नको’ ही मानसिकता समाजाने बदलण्याची गरज, ज्योती मराठे यांनी व्यक्त केले मत

Next

डोंबिवली : भारतीयांमध्ये मुलगी नको, ही एक मानसिकता तयार झाली आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज असून आईनेच मुलगा-मुलगी भेद करू नये. मुलींना चांगल्या पद्धतीने वाढवावे, असे मत नगरसेविका ज्योती मराठे यांनी व्यक्त केले.

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली आणि भारतीय डाक ठाणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा आणि कन्यारत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठे बोलत होत्या. या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले जाते. एकता मित्र मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम रविवारी पार पडला.



ज्या महिला पालकांना केवळ मुलगी आहे, अशा ४९ मातांना ‘कन्यारत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार गेल्या ११ वर्षांपासून प्रदान करण्यात येत असून आतापर्यंत ५१६० महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध केलेल्या २५ महिलांना ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने सन्मानित केले. सुकन्या योजनेचे पासबुक प्रातिनिधिक स्वरूपात १० महिलांना देण्यात आले. त्यामध्ये अमृता नारखेडे, रीता विश्वकर्मा, विनीता गावकर, प्रीती शेटे, सुनीता म्हात्रे, आरोही सावंत, चेतना एलगर, संगीता हेमाडे, ज्योती कुडेकर, नम्रता चौधरी यांचा समावेश होता.
यावेळी व्यासपीठावर ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेच्या उपाध्यक्ष शिवानी देसाई, डोंबिवलीच्या सहायक पोस्टमास्तर सुषमा ताम्हाणे, महात्मा जोतिबा फुले शिक्षण परिषद ठाण्याच्या अध्यक्षा, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, पत्रकार विश्वास कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठे म्हणाल्या, समाजात मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हा प्रकार रोखला पाहिजे. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. मुलींच्या भविष्यासाठी आतापासून तरतूद करण्यास सुरुवात करा. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी अडचण येणार नाही.
प्रधान म्हणाले, कोरोनाचा विषाणू आज ना उद्या देशातून हद्दपार होईल. मात्र, मुलगी नको, या विचाराचा विषाणू जो लोकांच्या डोक्यात वर्षानुवर्षे घर करून बसला आहे, तो नष्ट करण्याची गरज आहे. आपण आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत झालो असलो, तरीही अशा बुरसटलेल्या विचारांचे जोखड आपल्या मानगुटीवर अजून आहे. ते नष्ट करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत नेहते व सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी केले. संदीप जाधव यांनी सुकन्या योजनेची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात सखी फॉर गर्ल्स एज्युकेशन, घरकुल आणि नारी शक्ती यांना सामाजिक मदत संस्थेतर्फे करण्यात आली.

डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वयंसिद्धा या यू-ट्यूब मालिकेत नगरसेविका ज्योती मराठे, लता पाटील, नीता आरसुळे, वृषाली मुळ्ये, अश्विनी कुलकर्णी, स्वप्नगंधा करमरकर, कविता वैरागडे, शमशाद बेगम मुल्ला, अजिता घोडगावकर, वैशाली कांदळगावकर, डॉ. नीता निकम, कांचन साळगावकर, अ‍ॅड. विद्या गोळे, अर्चना पाटील, टिष्ट्वंकल वीरा, राजश्री मेणकुदळे, सृष्टी कांबळे, अलका भुजबळ, हर्षदा कक्कर, स्नेहल सोपारकर, करिश्मा खर्डीकर, अंजली जोशी, सुजाता नेने, अर्चना वेलणकर, साक्षी परब आदी महिलांच्या कार्याचा प्रवास उलगडण्यात आला.
या मालिकेची निर्मिती सुनंदा जोशी, हेमंत नेहते, अ‍ॅड. सुधा जोशी यांची असून योगेश जोशी यांनी लेखन, दिग्दर्शन व शलाका जयंत यांनी छायाचित्रण केले आहे. या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Jyoti Marathe expressed the need to change the mindset of 'don't want a girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.