कडोंमपा निवडणूक : बसपा ६० जागा लढवणार !
By admin | Published: October 12, 2015 04:35 AM2015-10-12T04:35:35+5:302015-10-12T04:35:35+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाऊनही बसपा केडीएमसीच्या निवडणुकीत रिंगणात उतरली आहे.
डोंबिवली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाऊनही बसपा केडीएमसीच्या निवडणुकीत रिंगणात उतरली आहे. एकूण जागांपैकी ६० जागांवर पक्षाचे उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी दिली. संबंधित उमेदवारांच्या मुलाखती दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आल्या असून सोमवार पर्यंत पक्षातर्फे त्यांच्या कागदपत्रांसह अन्य तांत्रिक गोष्टींची पूर्तता, तपासणी करण्यात येणार आहे.
टिटवाळयापासून डोंबिवली पर्यंत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण पूर्व-१२, कल्याण प. १८ , मोहना - ३, टिटवाळा - २, डोंबिवली पूर्व - पश्चिम - २० अशी वर्गवारी असल्याचे सांगण्यात आले. तळागळातील नागरिक नेहमीच दुर्लक्षित राहीला असून त्यांना न्याय देण्यासाठी बसपाने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला. सत्ताधा-यांनी अनेक वर्षे मागासवर्गीयांच्या निधीवर डल्ला मारला, त्यामुळे महापालिका क्षेत्रातील ४० हून अधिक वस्त्या गलीच्छ-बकाल अवस्थेत आहेत. पण यापुढे असे होऊ नये, तेथिल परिस्थिती सुधारावी, त्या ठिकाणच्या रहिवाशांचेही राहणीमान उंचावे, यासाठी जास्तीत जास्त
उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. जेथे जेथे मागासवर्गीयांची वस्ती आहे, तसेच जे पक्षासाठी
कार्यरत आहेत अशांपैकी काहींना उमेदवारी देणार असल्याचेही सांगण्यात आले. सोमवारी रात्री अथवा मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे.