केडीएमसीच्या शाळा राहिल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:55 AM2017-07-29T01:55:07+5:302017-07-29T01:55:11+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी केडीएमसीच्या ४०० कर्मचाºयांबरोबर महापालिकेचे शिक्षकही शुक्रवारी रवाना झाले.
कल्याण : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी केडीएमसीच्या ४०० कर्मचाºयांबरोबर महापालिकेचे शिक्षकही शुक्रवारी रवाना झाले. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षक आणखी दोन दिवस जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
भिवंडीपाठोपाठ मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या कामासाठीही केडीएमसीचे कर्मचारी मागवण्यात आले आहेत. तब्बल ४०० हून अधिक कर्मचारी मागवल्याने महापालिकेचा कारभार पुन्हा थंडावणार आहे. कर्मचारी पाठवण्यास विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी विरोध दर्शवला आहे.
दुसरीकडे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकांच्या कामांचे प्रशिक्षण सुरू झाल्याने शुक्रवारी केडीएमसीचे कर्मचारी रवाना झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयात कर्मचाºयांविना शुकशुकाट होता.
महापालिका शाळांमधील शिक्षकही प्रशिक्षणासाठी गेल्याने शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा एक दिवसाचा खाडा झाला असताना आता २० आॅगस्टला मतदान होणार असल्याने त्या कालावधीत दोन दिवस शिक्षकांना कामानिमित्त मीरा-भार्इंदरला जावे लागणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे.
सातवी इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्णपणे बदलला आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केडीएमसी पालिका शाळांतर्फे शुक्रवारी खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित आणि केडीएमसी शाळांसाठी कल्याणमधील टिळक चौकातील पालिकेच्या शंकरराव झुंजारराव शाळेत शिबिर घेण्यात येणार होते. परंतु, पालिकेचे शिक्षक निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने ते या शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासाठी २ आॅगस्टला शिबिर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांनी दिली.