महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Published: March 20, 2016 12:48 AM2016-03-20T00:48:24+5:302016-03-20T00:48:24+5:30

मागील कित्येक महिन्यांपासून टॅबचा विषय पटलावर घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक आक्रमक आहेत. मागील महासभेतदेखील महापौरांनी पुढील सभेत हा विषय पटलावर घेण्याचे

Kairachi basket on Mayor's order | महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

Next

ठाणे : मागील कित्येक महिन्यांपासून टॅबचा विषय पटलावर घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक आक्रमक आहेत. मागील महासभेतदेखील महापौरांनी पुढील सभेत हा विषय पटलावर घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु, आजच्या महासभेतदेखील तो पटलावर न आल्याने सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांंनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन जर महापौरांचे आदेश मानत नसेल तर आता त्यांनी आदेश देण्यापेक्षा विनंती करावी, असे आवाहन शिवसेनेचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी केले.
पुढील महासभेत हा विषय मंजुरीसाठी घेण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार, तो का घेतला नाही, असा सवाल वैती यांनी केला. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव तयार असून त्याला केवळ बजेट नसल्याने हा विषय मागे ठेवला आहे. परंतु, बजेटवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर तो मार्गी लावला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. जर, टॅबला बजेट नसेल तर मग, आता महासभेत जे प्रशासकीय आणि वित्तीय मान्यतेसाठी प्रस्ताव आले, तेदेखील प्रशासनाने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवकांना वेळेवर टॅब मिळतात आणि विद्यार्थ्यांना नाही, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भूमिका नारायण पवार यांनी विशद केली.
दुसरीकडे विद्यार्थ्यांना वेळेवर टॅब नाहीत, शैक्षणिक साहित्यही वेळेवर मिळत नसल्याचा आरोप मनाली पाटील यांनी केला. त्यावर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा दावा उपायुक्त जोशी यांनी केला. परंतु, हा दावा खोटा असून प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, पुढील चार दिवसांत याचा अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रशासनाचा अहवाल येईतो महासभा तहकूब करावी, अशी मागणी वैती यांनी केली. त्याला विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर, वैतींनी सभागृह सोडले, परंतु हा विषय मार्गी लावून महासभा सुरू ठेवा, अशी मागणी सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी केली. त्यानुसार या विषयाला कलाटणी देऊन महासभा सुरू झाली.

Web Title: Kairachi basket on Mayor's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.