पावसातही काकोळे गाव पाण्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:13 AM2017-08-02T02:13:24+5:302017-08-02T02:13:24+5:30
रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जीआयपी धरणाच्या काठावर वसलेल्या काकोळे गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ : रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जीआयपी धरणाच्या काठावर वसलेल्या काकोळे गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या धरणातील पाण्याचा वापर रेल्वेच्या मिनरल वॉटर प्रकल्पासाठी करण्यात येतो. मात्र या धरणाच्या काठावरील गावाला मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावात पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. मात्र राबवलेल्या योजनेतील जलवाहिनीतून पाणीच येत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
काकोळे गाव हे अंबरनाथ नगरपालिका हद्दीला आणि एमआयडीसीला लागून आहे. मात्र हे गाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्याने या गावाला पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. या गावात पाण्याची योजना मंजूर झाली. योजनेचे कामही झाले. काम पूर्ण झाल्यावर योजनेचा शुभारंभही झाला. शुभारंभाचे फोटो दाखवत योजनेचे बिलही लाटण्यात आले. मात्र एवढे सगळे झाल्यावरही या योजनेतून काकोळे गावाला पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे.
या गावाची लोकसंख्या ही एक हजाराहून अधिक आहे. तब्बल १५० हून अधिक कुटुंब या गावात राहतात. मात्र पाण्यासाठी त्यांच्यावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. महिलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावरील एमआयडीसीमधील कंपन्यांमधून पाणी भरण्याची वेळ आली आहे. तर काही महिला जीआयपी धरणात जाऊन पाणी भरतात. ज्यांना हे अंतर कापणे देखील शक्य होत नाही त्यांना गावाजवळ असलेल्या डबक्यातील कपारीतून निघणाºया पाण्याने तहान भागवण्याची वेळ आली आहे. सर्वत्र जलवाहिनी टाकून ठेवल्या आहेत. मात्र त्या जलवाहिनीसाठी पाणी आणायचे कुठून हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.