‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:06 AM2020-09-07T00:06:52+5:302020-09-07T00:07:02+5:30

पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त

‘Kakasparsh’ is becoming rare day by day; Special importance to crows in the patriarchal fortnight | ‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

googlenewsNext

- राहुल वाडेकर 

विक्रमगड : उकिरड्यावरील खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छतेची वागणूक मिळते, मात्र याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात. परंतु गेल्या काही वर्षांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची रूढी-परंपरा खूप जुन्या काळापासून आजही चालत आलेली आहे. ही परंपरा ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही जोपासली जात आहे. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची परंपरा आहे.

आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य देण्याची प्रथा-परंपरा असल्याने या दिवसांत महत्त्व असते ते कावळ्याला. कावळ्याने जर घास घेतला नाही, किंवा घास घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवणास बसत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. सध्या मात्र या कावळ्यांची संख्याच कमी झालेली दिसून येत आहे. पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बºयाचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. या वेळी घरातल्या बुजुर्गानाही दु:ख वाटते. कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो.

पितृ पंधरवड्याव्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र, या दिवसांत त्यांची काव-काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्याने चोच लावण्यासाठी त्यांची तासन्तास अनेक घाटांवर वाट पाहिली जाते. आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलावर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या प्रथा-परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यात आजही पाळला जात आहे.

Web Title: ‘Kakasparsh’ is becoming rare day by day; Special importance to crows in the patriarchal fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.