रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह
By पंकज पाटील | Updated: October 2, 2023 19:19 IST2023-10-02T19:13:34+5:302023-10-02T19:19:30+5:30
काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह
अंबरनाथ - रेल्वे प्रशासनातर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या रेलनीर उत्पादनांवर काकोळे गावाचा ठळक उल्लेख करावा, या मागणीला घेऊन आणि पाण्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी अनागोंदी कारभारा विरोधात, काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावात रेल्वेच्या मालकीचे जीआयपी तलाव असून त्याठिकाणी 2013 साली रेल्वे प्रवाश्यांना बाटलीबंद पाणी पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेलनीर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या काकोळे गावात रेल्वेने ब्रिटिशकाळात जीआयपी तलाव बांधला पण रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा कुठेही उल्लेख नाही. रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा नाव असावे या मागणीसाठी काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी आज महात्मा गांधी जयंतीला रेलनीर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे.
यासंदर्भात रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याला प्रतिसाद लाभला नाही, त्यामुळे रेल प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन सुरू केल्याची माहिती गायकर यांनी दिली. त्याचप्रमाणे रेलनीर प्रकल्पाला लागणारी वाहतूक सेवा टीसीसीय वाहतूक संघटनेच्या माध्यमातून सुरळीत सुरू आह. असे असताना रेलनीरचे उतपादन घटत असल्याचे कारण सांगून विविध रेल्वे स्थानकांवर रेलनीर पाणीपुरवठा बंद केल्याने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या मालवाहतूकदारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
संबंबधित मालवाहतूकदार स्थानिक ग्रामस्थ असून त्यांच्यावरील अन्याय देखील दूर करावा या दोन्ही मागण्यांसाठी सरपंच गायकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, बंडू देशमुख, चैनू जाधव, विलास पाटील, सचिन जाधव, सुरेश जाधव, देविदास पाटील, गणेश गायकर, प्रकाश गायकर, सूर्यकांत गायकर आदींनी सहभागी होऊन सरपंच गायकर यांना पाठिंबा दर्शवला.