कलानी कुटुंबाचे राजकीय सूत्र ओमी कलानीकडे? पप्पु कलानी यांची राजकारणातून निवृत्ती?
By सदानंद नाईक | Published: January 24, 2024 08:57 PM2024-01-24T20:57:56+5:302024-01-24T20:58:14+5:30
कलानी कुटुंब अपक्ष मात्र शिंदे यांना पाठिंबा, ओमी कलानी राहणार विधानसभेचे उमेदवार
सदानंद नाईक/उल्हासनगर : शहर राजकारणात दबदबा ठेवणारे माजी आमदार पप्पु कलानी राजकारणाबाहेर असून आम्ही कोणत्याही पक्षात नाही. राजकीय निर्णय मीच घेणार असून येत्या विधानसभेचा उमेदवार स्वतः राहणार असल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर म्हणजे पप्पु कलानी असे राजकीय समिकरण गेल्या तीन दशकापासून कायम आहे. कलानी यांचा पाठिंबा घेण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कलानी महलच्या पायऱ्या झिजविल्या आहेत. मात्र अचानक माजी आमदार पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकीय सूत्र माझ्याकडे राहणार असल्याचे सांगून पप्पु कलानी यांना थांबण्याचा इशारा दिला.
तसेच ओमी कलानी टीमचे २२ नगरसेवकांचा खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा असून येणाऱ्या विधानसभेत स्वतः उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट संकेत ओमी कलानी यांनी दिले. ओमी कलानी यांच्या प्रतिक्रियेमुळे पप्पु कलानी यांच्या राजकारणाचा अस्त झाला का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
माजी आमदार पप्पु कलानी हे जन्मठेपेच्या शिक्षेत जेल मध्ये असतांना युवानेते ओमी कलानी यांनी राजकीय सूत्र हाती घेतली. आई ज्योती कलानी हया राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार व शहरजिल्हाध्यक्ष असतांना महापालिका निवडणुकीत भाजप सोबत हातमिळवणी करून समर्थकांना भाजपच्या चिन्हावर ओमी कलानी यांनी उभे केले. ओमी कलानीमुळे कधीनव्हे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. मात्र अड्डीच वर्षात ज्योती कलानी यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली नसल्याच्या रागातून भाजप सोबत काळीमोड घेऊन शिवसेनेला पसंती दिली.
ओमी कलानी यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या लीलाबाई अशान ह्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. तेंव्हा पासून ओमी कलानी व शिंदे कुटुंबाचे संबंध मधुर राहिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेत उभी फूट पडल्यावर कलानी राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र ओमी कलानी यांच्या भूमिकेने कलानी राजकारण स्पष्ट झाले आहे.
राजकीय समीकरणे बघून निर्णय....ओमी कलानी
देश व महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी होत आहेत. त्यावेळची परिस्थिती बघून राजकीय निर्णय घेणार असल्याचे संकेत ओमी कलानी यांनी दिले असून सद्यस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत असल्याचे सांगितले. ओमी कलानी यांच्या निर्णयाने पप्पु कलानी यांचा राजकीय अस्त तर भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे चित्र उभे राहिले आहे.