उल्हासनगर राष्ट्रवादीत पुन्हा कलानीराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:55 AM2019-12-09T00:55:00+5:302019-12-09T00:55:04+5:30
शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी कलानी महालमध्ये बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
उल्हासनगर : शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी कलानी महालमध्ये बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पक्षात दोन गट असून गटनेता भरत गंगोत्री आणि शहर जिल्हाध्यक्ष हरचरण कौर यांना शह देण्यासाठी बैठकीसाठी हे ठिकाण निवडल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कलानीराज येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्योती कलानी पक्षाच्या शहराध्यक्ष आणि आमदार असताना मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून राष्ट्रवादीमधील बहुतांश पदाधिकारी आणि नगरसेवकांना ओमी टीममध्ये सामावून घेतले होते. पक्षात नावालाच असलेल्या ज्योती कलानी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाने त्याच दिवशी शहर जिल्हाध्यक्षपदी हरचरणसिंग कौर यांची नियुक्ती केली. तत्कालीन महापौर पंचम कलानी यांना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे ज्योती कलानी यांना एका रात्रीत राष्ट्रवादीने संधी दिली. त्यापूर्वी गटनेते गंगोत्री यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती.
विधानसभा निवडणुकीत ओमी कलानी यांनी ओमी टीमचे अस्तित्व कायम ठेवत कलानी यांचा प्रचार केला. मात्र, ज्योती कलानी यांचा पराभव झाला. उमेदवारी न दिल्याचा वचपा ओमी टीमने महापौर निवडणुकीत काढला. भाजपमधील ओमी समर्थक नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी सेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान केल्यामुळे त्या महापौरपदी निवडून आल्या.
माजी आमदार ज्योती कलानी नावालाच राष्ट्रवादी पक्षात आहेत. मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमचे अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे कलानी कुटुंबासोबतचे सलोख्याचे संबंध लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे कलानी कुटुंबाला पुन्हा राष्ट्रवादीत आश्रय मिळू शकतो. यातून कलानी कुटुंबाने युवक विंगची बैठक कलानी महालात घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीची सूत्रे कलानी महालातून हलण्याचे संकेत मिळत असल्याने कलानी कुटुंबामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकारण आणखी काय कलाटणी घेते याकडे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन
युवक विंगचे प्रवक्तेसुरज चव्हाण यांनी युवकांना मार्गदर्शन करून पक्षाला एकसंध आणि मजबूत करण्याचे आवाहन या बैठकीत केले. युवक विंगचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी युवक विंग मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यासाठी युवक विंगची बैठक घेतल्याचे यावेळी सांगितले.