कलानींचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला? कुटुंबासोबत NCP नेत्यांची बंद दाराआड "भोजनपे" चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:18 PM2021-10-24T17:18:55+5:302021-10-24T17:25:47+5:30
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह अन्य नेत्यांचे कलानी महलमध्ये भोजन...! मध्यरात्रीच्या साडे तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते कलानी महलमध्ये उपस्थित होते.
सदानंद नाईक -
उल्हासनगर - राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेत्यांनी कलानी कुटुंबाशी बंद दराआड संवाद साधल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, ही भेट पक्षाच्या माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांच्या स्मरणार्थ घेतली असल्याचे ओमी कलानी यांनी म्हटले आहे. ओमी टीम स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथील सभागृहात शनिवारी रात्री राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी, गटनेते व सभागृह नेते भारत गंगोत्री आदींनी पक्षाचा कार्यक्रम यशस्वी केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाचे व सोनिया धामी व गंगोत्री यांचे कार्यक्रमात कौतुक केले. कार्यक्रमानंतर शहराध्यक्षा सोनिया धामी यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांसाठी अल्पोहार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी कलानी महल गाठले. कलानी महलमध्ये सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मध्यरात्रीच्या साडे तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते कलानी महलमध्ये उपस्थित होते. यावेळी कलानी कुटुंबासोबत बंद दराआड नेत्यांनी बैठक घेतली. बैठकीत पप्पु कलानीही उपस्थित होते, असे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी कलानी कुटुंबाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल. अशी चर्चा शहरात रंगली आहे. शहरात कलानी कुटुंबाचा राष्ट्रवादी पक्षासोबत दुरावा निर्माण झाल्यावर, पक्षाची सूत्र भारत गंगोत्री यांच्याकडे गेली. गंगोत्री यांनी महापालिका सत्तेत शिवसेनेसोबत राहून सभागृहनेते पद मिळवून पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम राबविले. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली होती. तसेच त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तसेच मीना आयलानी या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. महापालिका निवडणुकीत पक्षाचे ४ नगरसेवक गंगोत्री यांच्या मुळे निवडून आणून पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले.
जितेंद्र आव्हाड यांना गणेश नाईक प्रकरणी टोमणा!
नवीमुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनीं पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. तेंव्हा पक्षासोबत गणेश नाईक हे विश्वासा घात करतील, यासंदर्भात पक्ष नेतृत्वाला माहिती दिली होती. या वाक्याची आठवण शहर जिल्हाध्यक्ष सोनिया धामी यांनी परिवार संवाद कार्यक्रमात कलानी कुटुंबाचे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना करून दिली. आव्हाड साहेब यांच्या सारखी अवस्था आमची झाल्याचे धामी यांचे म्हणणे होते. यानंतर पक्षाच्या नेत्यांनी कलानी महल येथे भोजन केल्याची टीका होत आहे. तर कलानी कुटुंबाला आपला विरोध कायम असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री यांनी दिली आहे.