काव्यमैफिलीतून कालिदास जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:11+5:302021-07-14T04:45:11+5:30
ठाणे : आषाढाच्या प्रथम दिवशी महाकवी कालिदास यांची जयंती साजरी केली जाते. रविवारी काव्यमैफिलीतून त्यांचे सर्व साहित्य रसिकांसमोर आणून ...
ठाणे : आषाढाच्या प्रथम दिवशी महाकवी कालिदास यांची जयंती साजरी केली जाते. रविवारी काव्यमैफिलीतून त्यांचे सर्व साहित्य रसिकांसमोर आणून सर्वांना काव्यानंद मिळवून दिला. यानंतर सर्व कवी, कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यात सर्व प्रांतातील काव्य कलाकारांचा समावेश होता. त्यामध्ये ठाण्यातील कवी, कवयित्रींचा महत्त्वाचा वाटा होता.
महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे ४१ या संस्थेच्या ठाणे, पुणे, मुंबई या शाखांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिन संपन्न झाला. यानिमित्त मुंबई, ठाणे जिल्ह्याचे महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे उपप्रमुख योगेश जोशी यांच्या पुढाकाराने आयोजित काव्य मैफिलीत कवयित्री आरती कुलकर्णी, कवी ॲड. रुपेश पवार, कवयित्री अंजुषा पाटील, कवी जयंत भावे, कवी रमेश तारमळे आणि इतर ठाणेकरांचा सहभाग होता. या ऑनलाइन मैफिलीत ४५ कवींनी सहभाग घेतला. सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते योगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातपुते म्हणाले, इच्छुक साहित्यप्रेमींनी या संस्थेत यावे. ही चळवळ पुढे नेण्यात मदत करावी. महेंद्र ठाकूरदास म्हणाले, या संस्थेचा उद्देश संस्कृत भाषेचा विचार प्रसार आहे. तरीसुद्धा अशा हिंदी मराठी साहित्यिक कार्यक्रमातून एकंदर वाङ्मयाला चालना मिळवून, साहित्य अभ्यासकांनी संस्कृत भाषेकडे वळावे. हा या संस्थेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी संस्थेच्या स्थापना वर्षाची यानिमित्ताने आठवण करून दिली.