कलिना विधानसभा : रस्ते वाहतूककोंडीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:30 AM2019-09-30T03:30:38+5:302019-09-30T03:30:51+5:30
कलिना विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ या वाहतूककोंडीत वाया जात असून, कलिना येथील वाहतूककोंडी कधी फुटणार, असा सवाल रहिवाशी करत आहेत.
मुंबई : कलिना विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ या वाहतूककोंडीत वाया जात असून, कलिना येथील वाहतूककोंडी कधी फुटणार, असा सवाल रहिवाशी करत आहेत.
कलिना येथे वाहतूककोंडीचे मुख्य कारण आहे ते कल्पना ते एअर इंडिया पुलाचे काम. या पुलाचे काम खूप संथ गतीने सुरू आहे. गेल्या ८ वर्षांपासून हे काम रखडले आहे. या पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतूक ठप्प होते. वाहतूककोंडी विरोधात रहिवाशांनीही आवाज उठविला. आंदोलने करण्यात आली़, परंतु या पुलाच्या कामाला गती मिळाली नाही, तर दुसरीकडे एलबीएस मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहतूककोंडी असते. हा रस्ता सायंकाळी तर पूर्णपणे जाम असतो. प्रवाशांचा वेळ यामध्ये वाया जातो. घाटकोपरवरून अंधेरीकडे जाणारा कमानी रास्ता बंद केला आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होत आहे़ हा मार्ग काळे मार्ग वरून वळविण्यात आला आहे. चेंबूर सांताक्रुज लिंक रोड संपतो, त्या भागात वाहतूक ठप्प होते. यासोबतच बीकेसी जाणाऱ्या मार्गवर वाहतूककोंडी असते. त्यामुळे वाहतूककोंडीतून कधी सुटका होणार, असा सवाल रहिवासी विचारत आहेत.
वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त आहे. कल्पना ते एअर इंडिया पुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, तरच नागरिकांना या वाहतूककोंडीतून दिलासा मिळेल.
- राकेश पाटील, रहिवासी.