काडतूसे बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता: कल्पेश शिंदे ग्रीसमधून ठाण्यात परतला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:34 PM2018-02-12T22:34:27+5:302018-02-12T22:47:30+5:30
अडीच वर्षांपूर्वी इसिसला मदत केल्याचा तसेच शेकडो शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली ग्रीस नौदलाने अटक केलेल्या ठाण्यातील कल्पेश शिंदे या खलाशाची आता निर्दोष सुटका झाली आहे.
ठाणे : ‘इसिस’ला सहकार्य केल्याचा तसेच पाच हजार ५०० बंदूका आणि पाच लाख काडतूसांची वाहतूक करतांना ग्रीस पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी अटक केलेला ठाण्यातील भारतीय खलाशी कल्पेश शिंदे (२४) हा तरुण आता मायदेशी परतला आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने ग्रीसच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याने त्याच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
दहशतवाद्यांना काडतूसे पुरवित असल्याचा आरोप असलेला कल्पेश हा तब्बल २९ महिने ग्रीसच्या तुरुंगात होता. प्रशिक्षणार्थी खलाशी म्हणून तो नव्यानेच २०१५ मध्ये लिगल पोर्टवर कामावर रुजू झाला होता. त्यामुळे त्याची सतत जहाजावर नोकरी असायची. त्याचवेळी तुर्कीवरुन लिबियाला जाणा-या पहिल्याच जहाजावर त्याची डयूटी असतांना ग्रीसचा समुद्र पार करतांनाच त्यांच्या जहाजाची स्थानिक पोलिसांनी अचानक तपासणी केली. त्यावेळी कंटेनरच्या झडतीत पाच हजार ५०० बंदूका आणि पाच लाख काडतूसे त्या जहाजामध्ये आढळली. त्यामुळे ग्रीसच्या नौदलाने सात जणांसह त्याला पकडले. बोटीतून दिलेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारेच तो हे जहाज घेऊन जात होता. कंटेनरमधील मालाशी आपला संबंध नसल्याचेही त्याने त्यावेळी ग्रीस पोलीस आणि नौदलाला सांगितले. परंतू, त्याची कोणतीही बाजू ऐकली गेली नाही. त्याला तेथील पोलिसांनी अटक करुन कोठडीत ठेवले. नंतर १५ दिवसांनी त्याला ग्रीसच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. पाच हजारांमध्ये दोन भारतीय कैदी. त्यावेळी सोबतच्या अनेकांकडे त्याने मदतीचा हात मागितला. पुढे भारतीय दूतावासाशी संपर्क करुन आपली कैफियत मांडली. महिन्यातून दोन ते तीन वेळा या दूतावासातील अधिकारी त्याला भेटण्यासाठी येत होते. या अधिका-यांनी दिलेल्या पैशांमुळेच तो ठाण्यातील वृंदावन सोयायटीत राहणा-या आपल्या कुटूंबियांशी संपर्क साधू शकला. तिथे कोणतीही पिळवणूक नव्हती. त्यांच्यातील अनेकांना आपले निर्दोषत्व कळून आले. पण कोणतीही चूक नसतांना जो गुन्हा केलाच नाही, त्या गुन्हयाखाली अटक झाली. याचे शल्य नेहमी असायचे, असेही त्याने प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. सुरुवातीला या गुन्हयात १५ वर्षांची शिक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आपल्या पायाखालची जमीनच सरकल्याचे तो म्हणाला. त्यानंतर दहा दिवसांतच याशिक्षेविरुद्ध तेथील वरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी एक वर्षानंतर सुनावणी होईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्याच काळात मामा राजेश कदम आणि आई यांनी भारतीय दूतावासाशी वारंवार संपर्क साधल्यामुळे तब्बल २९ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आपली निर्दोष सुटका झाल्याचे कल्पेशने सांगितले.