कल्पिता पिंपळे यांना उपायुक्तपदी पदोन्नती; फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गमावली होती हाताची बोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 07:03 PM2022-04-20T19:03:51+5:302022-04-20T19:30:51+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना बदली आणि पदाेन्नती मिळाल्यानंतर आता पुन्हा सहायक आयुक्त शंकर पाटोळे आणि किरण तायडे ...
ठाणे : ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना बदली आणि पदाेन्नती मिळाल्यानंतर आता पुन्हा सहायक आयुक्त शंकर पाटोळे आणि किरण तायडे यांना महापालिकेने उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. कल्पिता पिंपळे यांना उपायुक्त म्हणून पदोन्नती देत राज्य शासनाने त्यांची पनवेल महापालिकेत बदली केली आहे.
ठाणे महापालिकेत उपायुक्त दर्जाची एकूण दहा पदे आहेत. त्यापैकी सहा जागांवर शासनाचे तर चार जागांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेने वाढीव आकृतिबंध आराखडा तयार केला होता. त्यास नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली असून उपायुक्त दर्जाची दोन पदे मंजूर झाली आहेत. या दोन जागांवर पालिकेने नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे आणि कर विभागातील अधिकारी किरण तायडे यांची नियुक्ती केली आहे.
दुसरीकडे घोडबंदर येथील कासारवडवली भागात माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता. त्यात त्यांना हाताची बोटे गमवावी लागली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना हा हल्ला झाला होता. काही महिन्यांच्या उपचारानंतर त्या पुन्हा कामावर हजर झाल्या होत्या. परंतु आता राज्य सरकारने त्यांना उपायुक्त पदाची बढती देऊन त्यांची पनवेल महापालिकेत बदली केली आहे. एकूणच मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत बढतीचे वारे वाहू लागल्याचे दिसत असून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यामुळे न्याय मिळाला असल्याचे दिसत आहे.