Jayant Patil: काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही : प्रकल्पांचा घेतला आढावा, ठाणे जिल्ह्याची टंचाई दूर होण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:25 AM2021-10-26T06:25:53+5:302021-10-26T06:26:09+5:30
Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते
ठाणे : न्यायप्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यापाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. यामुळे काही ठिकाणी कमी पाणी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणीपुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे लागणार आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीला एसटीपी प्लांटचे पाणी बंधनकारक
जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रिसायकलिंगच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एमआयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लांटचा वापर करून रिसायकलिंग करून वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी मोठे प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
टास्क फोर्स
पाइपलाइन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे ते म्हणाले.
येऊर बंधाऱ्याची दुरुस्ती
येऊर येथील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यातील पाण्याचा वापर ठाण्याच्या काही भागाला होईल. मुंब्रा परिसरातील डोंगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापुरी बंधारे बांधून त्याचा वापर कळवा आणि मुंब्रा येथे करून पाणी समस्या कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.