कळवा, मुंब्य्रात वीज खासगीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:51 PM2018-12-03T23:51:07+5:302018-12-03T23:51:18+5:30
कळवा, मुंब्रा, दिवा या भागांत वीज वितरणासाठी फ्रेन्चाइजी (खाजगीकरण) नेमण्याच्या महावितरणच्या निर्णयास राष्ट्रवादीने विरोध केला आहे.
ठाणे : कळवा, मुंब्रा, दिवा या भागांत वीज वितरणासाठी फ्रेन्चाइजी (खासगीकरण) नेमण्याच्या महावितरणच्या निर्णयास राष्ट्रवादीने विरोध केला आहे. महावितरणने आपला निर्णय बदलला नाही, तर खाजगी ठेकेदारांना कळवा, मुंब्य्रासह इतर भागांत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. सुरुवातीला खाजगीकरणाची मागणी आम्हीच केली होती. परंतु, सध्या ज्या पद्धतीने वाढीव बिले ग्राहकांना पाठवली जात आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादीने खासगीकरणाचा निर्णय बदलल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महावितरणने मागील आठवड्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भिवंडीच्या धर्तीवर कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही विजेचे खाजगीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, त्यांचा हा निर्णय चुकीचा असून राज्य सरकारने यात लक्ष घालून येथील नागरिकांची आधी मते जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
भिवंडीत आणि मुंबईत खाजगीकरणाचा हा प्रयोग फसला असल्याचे सांगून ठाण्यातील या भागांमध्येसुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. भिवंडीकरांना आजही वाढीव बिले येत आहेत. मुंबईत तर राज्य शासनाने या खाजगीकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळेच या खाजगीकरणाला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही महिने व्यवस्थित वीजबिल ग्राहकांना येत होते. परंतु, आता अचानक त्यात ३० ते ४० टक्कयांची वाढ कशी झाली, असा सवालही त्यांनी केला. यामध्ये केवळ आपल्या चुकांवर पांघरूण घालून ग्राहकांवर हा बोजा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सध्या लावण्यात आलेले वीजमीटर हे फास्ट असून त्यातून केवळ जास्तीचे बिले वसूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
>१५ दिवसांत तोडगा काढण्याची मागणी
केवळ कळवा, मुंब्य्रातच नाही तर संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांविरोधात राष्टÑवादी आता आक्रमक भूमिका घेणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ दिवसांत बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, तोडगा काढला गेला नाही, तर मात्र वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.