कळवा रुग्णालय आणि गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा प्रकरण अडकणार आचांसहितेच्या कात्रित
By अजित मांडके | Published: February 20, 2024 03:49 PM2024-02-20T15:49:51+5:302024-02-20T15:50:16+5:30
मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या कामांचा नारळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु असे असले तरी यातील राम गणेश गडकरी रंगायतन आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. निविदा प्रक्रिया देखील या कामांच्या अद्याप राबविण्यात आलेल्या नाहीत. तर या कामांसाठी आवश्यक असलेला निधी देखील राज्य शासनाकूडन महापालिकेला प्राप्त झालेला आहे. तरी देखील या कामांचा मुहुर्त हुकणार असल्याचेच चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्त्यांची कामे देखील आता अंतिम टप्यात आली आहेत. सौंदर्यीकरणाअंतर्गत सुशोभीकरण केले गेले आहे. शौचालयांच्या दुरुस्तीचे कामही अंतिम टप्यात आले आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरासाठी वाढीव पाण्याचे नियोजन करण्यासाठी रिमॉडेलींगची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी तब्बल ३२३ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. यातील संप, पंप यांची २५ कोटींची कामे वगळता इतर कामांच्या निविदा अंतिम झाल्या असून त्याच्या वर्क आॅडर्र देखील येत्या काही दिवसात दिल्या जाणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
परंतु दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाकडून ६० कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तो निधी देखील पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या निधीतून रुग्णालयात अतिरिक्त ५०० खाटा वाढविल्या जाणार आहेत. तसेच रंगरंगोटी, नवीन एसी बसविणे आदींसह इतर महत्वाची कामे केली जाणार आहेत. परंतु अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम झालीच नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे देण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो निधी देखील पालिकेला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रंगायतनची दुरुस्ती करतांना कलाकारांची मते देखील विचारात घेतली जात आहेत. १९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश आहे. परंतु या प्रकल्पाची देखील निविदा प्रक्रिया अद्यापही अंतिम झालेली दिसून आलेली नाही.
गडकरी रंगायतनचा खर्च वाढणार
राज्य शासनाकडून जरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींचा खर्च मंजुर झाला असला तरी देखील या कामाचा खर्च आणखी दोन ते तीन कोटींनी वाढू शकतो असा अंदाज महापालिकेच्या संबधींत विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार त्याचे नियोजन केले जात आहे. तसेच ठाणेकरांना एक प्रकारे अभिमान वाटावा अशा पध्दतीने दुरुस्तीचे हे काम केले जाणार आहे. त्यामुळेच निविदा प्रक्रियेला वेळ जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु मार्च च्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या आधी या कामांच्या निविदा अंतिम होऊन वर्क आॅर्डर दिली गेली नाही, तर मात्र या दोन्ही दुरुस्तींच्या कामे आणखी तीन महिने उशीरा सुरु होतील असा अंदाज वर्तविली जात आहे.