कळवा रुग्णालयाचा चौकशी समितीचा अहवाल लांबला, २५ ऑगस्टपर्यंत येणं होतं अपेक्षित
By अजित मांडके | Published: September 12, 2023 03:48 PM2023-09-12T15:48:27+5:302023-09-12T15:49:53+5:30
चौकशी अधिकारी आयुष्यमान भव कार्यक्रमात व्यस्त
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या मृत्युच्या तांडवा संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल २५ ऑगस्ट पर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे महिना उलटूनही कोणावरही कारवाई झालेली नाही. परंतु चौकशी समितीने अहवाल तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु केंद्राच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमात सर्वच व्यस्त असल्याने अहवाल लांबला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पुढील दोन दिवसात आणखी सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी याठिकाणी हजेरी लावून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. काहींनी तर या प्रकरणाची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार या समितीच्या माध्यमातून तत्काळ चौकशीही सुरु झाली होती. या चौकशीत येथील मुख्य अधिष्ठता यांच्यासह रुग्णांवर उपचार करणाºया सर्वच डॉक्टरांची कसुन चौकशी करण्यात आली होती. तसेच महत्वाचे कागदपत्रे देखील हाती घेतली गेली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार २५ आॅगस्ट पर्यंत याचा अहवाल समोर येणे अपेक्षित होते. त्यानुसार कारवाई देखील केली जाणार होती. परंतु २५ आॅगस्ट नंतर पुन्हा १० दिवसांचा अवधी जाईल असे सांगण्यात आले होते. आता ते १० दिवसही उलटून गेले आहेत. परंतु अद्यापही चौकशी समितीचा अहवाल काही पुढे आलेला नाही. परंतु चौकशी समितीचा अहवाल अंतिम झाला असल्याची सुत्रांनी दिली. परंतु सध्या राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा केंद्राच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत. त्यात चौकशी समितीमधील अधिकारी देखील व्यस्त झाले असल्याने अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु अहवाल लांबला गेल्याने, या घटनेचे गांर्भीयही निघून जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.