कळवा-मुंब्रा हाच अडथळा

By admin | Published: January 5, 2017 05:53 AM2017-01-05T05:53:12+5:302017-01-05T05:53:12+5:30

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला

Kalwa-Mumbra is the only obstacle | कळवा-मुंब्रा हाच अडथळा

कळवा-मुंब्रा हाच अडथळा

Next

अजित मांडके, ठाणे
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला तरी या दोन्ही पक्षांची भिस्त ही कळवा-मुंब्रा या परिसरावर असल्याने हाच मुद्दा आघाडी होण्यात अडसर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील स्थानिक नेत्यांना युती हवी असली तरी सत्तेपासून दूर असलेली मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील आघाडीबाबत चाचपणी सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे संघटन कमकुवत असून एकच चेहरा मतदारांपुढे नाही. अनेक नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेना अथवा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते राजण किणे यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेसला फुटीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा बरीच चांगली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. ठाण्यात त्यांचीही चांगलीच पडझड झाली आहे.
कोपरी, शहरातील काही भागातील नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. उमेदवारांचा शोध दोन्ही पक्ष घेत असले तरी काँग्रेसने उमेदवारांकरिता चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली होती.
सद्य राजकीय परिस्थिती आणि नगरपालिका निवडणुकींचा लागलेला निकाल पाहूनच ठाण्यात दोन्ही काँग्रेसनी आघाडीचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
मात्र आघाडी केवळ ठाणे शहरापुरती मर्यादीत ठेवायची आणि कळवा, मुंंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होत आहे. कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळेच यामध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे असाव्यात, अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे.


शिष्टाईचे शरद पवार यांचे संकेत
ठाणे : मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभी करण्याच्या निर्णयाचे शरद पवार यांनी बुधवारी स्वागत करतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी याबाबत संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंब्रा येथे चौपाटी उभी करण्याकरिता अतिक्रमणांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केल्याने विधान परिषदेत सभापतींनी कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी रेतीबंदरचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य केल्याने महापालिकेच्या महासभेत कारवाईचे समर्थन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने राजीनामे देण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आयुक्तांविरुद्ध आणि ठरावाच्या सूचक-अनुमोदकांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी चौपाटी उभी करण्याचे स्वागत करतानाच तेथे ५० वर्षांपासून राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या लोकांचे जवळच असलेल्या रिकाम्या भूखंडावर पुनर्वसन करावे. याबाबत मी स्वत: आयुक्त जयस्वाल यांच्याशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.
मुंब्य्रात रस्ते, पिण्याचे पाणी अशा प्रमुख समस्या आहे. आम्ही सत्तेत नसलो तरीही ठाणे पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव बनवून दिल्लीत पाठवू. (प्रतिनिधी)

Web Title: Kalwa-Mumbra is the only obstacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.