कळवा-मुंब्य्रात मेट्रोची फलकबाजी, शिवसेनेने मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 02:59 AM2018-12-23T02:59:46+5:302018-12-23T03:00:35+5:30
कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती.
ठाणे : कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती. परंतु, आता अवघ्या पाच दिवसांत याच भागात पुन्हा आभाराचे बॅनर लागले आहेत. परंतु, ते बॅनर राष्टÑवादीचे नसून शिवसेनेने लावल्याने अचानक पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मेट्रो-४ प्रकल्पाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. कल्याण-भिवंडी मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोचीही बांधणी करण्याचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, यामध्ये कळवा आणि मुंब्य्राच्या एकाही भागाचा समावेश नसल्याचा दावा राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानुसार, कळवेकर आणि मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का, असा सवाल करून त्या परिसरात त्या आशयाचे बॅनरही पाच दिवसांपूर्वी लावले होते. मेट्रोची लाइन कुठे न्यायची, हे काम वास्तविक खासदारांचे असते. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सत्ताधाऱ्यांकडूनही आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत, त्यामुळेच आयुक्त जयस्वाल यांनीच मेट्रोसाठी काहीतरी करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली होती. मुख्य मेट्रो किंवा अंतर्गत मेट्रोत कळव्याचा आणि मुंब्य्राचा समावेश करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.
राष्टÑवादीच्या आमदारांनी मेट्रोबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करूनये. मागील महिन्याच्या महासभेतच मंजुरी आलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात कळवा-मुंब्य्राचा स्पष्ट उल्लेख होता. परंतु, राष्टÑवादीच्या आमदार आणि शहराध्यक्षांना याची माहिती त्यांच्या नगरसेवकांनी दिली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. केवळ नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.
- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठाणे महापालिका
पाच दिवसांत मंजुरी कशी?
मात्र, आता या फलकबाजीस पाच दिवस उलटत नाही, तोच मेट्रो मंजूर केल्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत. परंतु, हे बॅनर राष्टÑवादीचे नसून ते शिवसेनेने लावल्याने अवघ्या पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, तिचा डीपीआर केव्हा मंजूर झाला, महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव कधी मंजूर झाला, असे अनेक प्रश्न राष्टÑवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत.
शिवसेनेने घेतला प्रस्तावाचा आधार
मागील महिन्याची तहकूब महासभा १९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. तीत अंतर्गत मेट्रो सल्लागार निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता.
याच प्रस्तावात दुसºया टप्प्यात कळवा आणि मुंब्य्राचा समावेश केला जाईल, असा उल्लेखही आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
आता याच ठरावाचा आधार घेऊन शिवसेनेने कळवा, मुंब्रा भागात भले मोठे बॅनर लावून राष्टÑवादीची हवाच गुल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.