मोक्कांतर्गत वॉन्टेड आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:30 PM2019-08-18T22:30:27+5:302019-08-18T22:34:51+5:30
उल्हासनगर येथील संदीप उतेकर यांचे २०१६ मध्ये निलेश यादव याच्यासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अपहरण करुन त्यांच्याकडून १७ लाखांची रोकड लुटली होती. याच प्रकरणात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या यादवला आता कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे: उल्हासनगर येथील एका रहिवाशाचे अपहरण करुन त्याच्याकडून १७ लाख रुपयांची रोकड उकळणाऱ्या टोळीचा म्होरक्या निलेश यादव (२३, रा. पौंडपाडा, कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तो मोक्कांतर्गत गुन्हयातही वॉन्टेड होता. त्याला आता मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उल्हासनगर येथील संदीप उतेकर यांचे २०१६ मध्ये यादव याच्यासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अपहरण करुन त्यांच्याकडून १७ लाखांची रोकड लुटली होती. याच प्रकरणामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दरोडा आणि अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. यातील चौघा आरोपींना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यापैकी यादव आणि त्याच्या साथीदार मात्र गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होते. यादव याच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अर्थात मोक्कांतर्गतही मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली होती. तेंव्हापासून वॉन्टेड असलेला यादव हा कळव्यातील पौंडपाडा येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त एस. एस. बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बागडे यांच्यासह उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नाईक संदीप महाडीक आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष ढेबे आदींच्या पथकाने दत्तवाडी, कळवा येथून १७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर त्याला मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती बागडे यांनी दिली.