कळवा पोलिसांनी नागरिकांना केले ६० मोबाईल परत
By जितेंद्र कालेकर | Published: October 6, 2023 09:57 PM2023-10-06T21:57:12+5:302023-10-06T21:58:14+5:30
पोलिस उपायुक्तांच्या हस्ते वाटप: चार लाख ५६ हजारांच्या मोबाईलचा लागला शोध.
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा परिसरातून नागरिकांचे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हरविलेल्या अशा चार लाख ५६ हजार ८५० रुपयांच्या ६० मोबाईलचा शोध घेण्यात आला आहे. हे सर्व मोबाईल पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते शुक्रवारी संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
कळवा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल २०२२ आणि २०२३ या वर्षात हरविले होते. यात काहींचे माेबाईल हे प्रवासात तसेच इतरत्र गहाळ झाले होते. तर काहींचे ते चोरीस गेले होते. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया ोथाेरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कुंवर, उपनिरीक्षक किरण बघडाणे, विजय गोऱ्हे , पोलिस अंमलदार नामदेव कोळी, प्रशांत लवटे आणि स्वप्नील खपाले आदींच्या पथकाने या मोबाईलच्या शोधासाठी विशेष कामगिरी बजावली. या मोबाईलची सविस्तर माहिती सीईआयआर या केंद्र सरकारच्या अॅपमध्ये भरण्यात आली होती. त्यानंतर या मोबईलवर तांत्रिक पद्धतीने, बारकाईने विश्लेषण करीत हरविलेल्या मोबाईलच्या पत्त्यांबाबतची माहिती काढण्यात आली.
संबंधित ठिकाणी जाऊन हे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. गहाळ मोबाईल मिळाल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली होती. ज्यांच्या हाती लागले, त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले. हेच सर्व मोबाईल ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी संबंधित तक्रारदार यांना पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचे निरीक्षक थाेरात यांनी सांगितले. आपले मोबाईल सुखरुप मिळाल्यांनतर मोबाईलधारकांनी समाधान व्यक्त केले.