मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:05 AM2022-07-10T10:05:28+5:302022-07-10T10:06:45+5:30
कारगिल डोंगरावरील विहिरीत बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू
ठाणे : कळवा, पारसिक हिल येथील कारगिल डोंगरावरील विहिरीत पोहताना नवी मुंबई दिघा येथील सुमित मनोज माळी या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला.
शुक्रवारी सुमारे ७०० ते ८०० मीटर उंची असलेल्या डोंगरावर असलेल्या विहिरीमध्ये तो सहा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह अंदाजे ३० ते ३५ फूट खोल असलेल्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला. विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न असल्याने तो बुडाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, अशी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान मित्रांसोबत पोहायला म्हणून गेलेल्या मुलाचा दुसऱ्या दिवशी मृतदेहच घरी आल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कळवा पूर्व येथील कारगिल डोंगरावरील विहिरीत एकजण बुडल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनीवरून मिळाली. त्यानंतर कळवा पोलीस कर्मचारी, सहायक आयुक्त (कळवा प्रभाग समिती), प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील स्विमर्स, तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण, हा प्रकार सुमारे ७०० ते ८०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगरावरील विहिरीत घडला होता. त्यातच जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे व रात्रीच्या अपुऱ्या प्रकाशामुळे त्या ठिकाणी पोहचणे अशक्य होते. तसेच कळवा पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांच्या परवानगीने शोधकार्य थांबविले होते. शनिवारी सकाळी ७:३० पासून शोधकार्य सुरू केले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी १०:३० च्या सुमारास युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
खोलीचा व पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
सुमित माळी सहा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. विहीर ही अंदाजे ३० ते ३५ फूट खोल असून विहिरीच्या खोलीचा व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सुमित विहिरीमध्ये बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान मृतदेह डोंगरावरून खाली आणण्यासाठी ही सुमारे ५० मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.