कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्ताने दिली अतिक्रमण आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
By अजित मांडके | Published: July 23, 2022 01:28 PM2022-07-23T13:28:56+5:302022-07-23T13:29:20+5:30
नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत वाढ करणार
ठाणे : अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी ठार मारण्याची तसेच कुटुंबातील सदस्यांना उद्वस्त करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महेश आहेर यांनीच पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. महेश आहेर हे या कारवाया करण्यात आघाडीवर आहेत. कळवा येथील काही नागरिकांनी महेश आहेर यांच्याकडे गुगल मॅपिंगसह तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने महेश आहेर यांनी समीर जाधव यांना दूरध्वनीवर संपर्क साधून कळवा येथे कारवाई करण्यासाठी पथकासह येत असल्याचे सांगितले. त्यावर समीर जाधव यांनी, तुझे हातपाय तोडून ठार मारेल; तुझ्या कुटुंबालाही संपवून टाकेन, अशी धमकी दिली. या संदर्भात महेश आहेर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आपण गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदा बांधकामावर कारवाई करीत आहोत. इतर अधिकारी सहकार्य करीत असताना समीर जाधव यांनी आपणास धमकी दिली आहे. त्यामुळे आपण गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून महेश आहेर म्हणाले की, या धमकीच्या संदर्भात आपण नगरविकास खात्याकडे अहवाल पाठवणार आहोत. तसेच बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा वेग अधिक तीव्र करणार असून मुख्यालयातूनच नवीन विशेष पथक स्थापन करून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार आहोत, असेही स्पष्ट केले.