कल्याण-अंबरनाथ रस्ता मार्गी लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:29 PM2018-07-21T23:29:21+5:302018-07-21T23:29:49+5:30
बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे.
उल्हासनगर : अखेर तीन वर्षांपासून अर्धवट पडलेल्या कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम मार्गी लागण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. रस्ता पुनर्बांधणीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात एक हजारापेक्षा अधिक दुकानदार बाधित झाले. अशंत: बाधित व्यापाºयांना दुरूस्ती व दुमजली बांधण्याची तोंडी परवानगी महापालिकेने दिली. तर पूर्णत: बाधित व्यापाºयांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी मार्केटमध्ये २०० चौरस मीटरचे गाळे देण्याचा ठराव मंजूर केला. मात्र १५ पेक्षा अधिक दुकानदारांनी महापालिकेवर अविश्वास दाखवत न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कारवाई होण्यापूर्वी पर्यायी जागेची मागणी करून कारवाईला स्थगिती मिळवली. १७ दुकानदारांच्या भूमिकेमुळे संपूर्ण रस्त्याचे काम रखडले.
एमएमआरडीएने रस्ता विकसित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. रस्ता पुनर्बांधणी करत नसाल तर मंजूर निधी परत करा असे पत्र एमएमआरडीएने पालिकेला पाठवले. या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले.
१७ दुकानदारांची बैठक पाटील यांनी घेतली. त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे आयुक्तांनी जाणून घेतले. व्यापाºयांनी समस्यांचा पाढाच आयुक्तांसमोर वाचला. बैठकीला उपायुक्त संतोष देहरकर, नगररचनाकार मिलिंद सोनावणे, सहायक आयुक्त गणेश शिंपी उपस्थित होते. पालिकेने तातडीने कार्यवाही सुरू करावी अशी व्यापाºयांची अपेक्षा आहे.
बंद गाळे देणार?
महापालिकेने आरक्षित भूखंड विकसित करण्याची परवानगी दिली. मात्र विकसित जागेपैकी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत करायची अट होती. त्यापैकी दोन ते चार बिल्डरांनी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत केली. त्यातील व्यापारी गाळे न्यायालयात गेलेल्या व्यापाºयांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.