कल्याण एपीएमसी निवडणूक: मनसे, राष्ट्रवादीसाठी भाजपाची रसद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:35 AM2019-03-15T00:35:53+5:302019-03-15T00:36:13+5:30
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये युती नाही. त्यामुळे भाजपानेमनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेला एकटे पाडण्याचा भाजपाचा हा डाव बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलाच रंगला आहे. मात्र, राजकीय नेत्यांनी मतदारयादीतील घोळ दूर करण्यावर भर दिलेला नाही. दुसरीकडे याविषयी प्रशासकीय यंत्रणेने हात वर केले आहेत. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.
सरकारच्या नव्या नियमानुसार १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, दोन जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने १६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याकरिता ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, २१ हजार ६७ मतदार आहेत. परंतु, दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने रविवारी निवडणुकीत १८ हजार ५३० मतदार मतदान करणार आहे. १५ जागा या शेतकरी मतदारांसाठी आहेत. एक जागा हमाल-तोलाई व एक जागा व्यापारी-अडते यांच्यासाठी आहे. यापूर्वी शेतकऱ्याला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क नव्हता. परंतु, आता शेतकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारयादीत घोळ असल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांसह मतदारांनी नोंदवल्या आहेत. मात्र, त्याची दखल सरकारी यंत्रणेने घेतलेली नाही. यादीतील ७०० मतदारांच्या नावात घोळ आहे. अनेकांची नावे व वय चुकीचे आहे. मात्र, आता त्यात काहीच बदल करता येणार नाही, असे सांगून सरकारी यंत्रणेकडून हात वर केले जात आहेत. मतदानावेळी यंत्रणेने हरकत घेतल्यास मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच चुकीच्या नावांचा फटकाही उमेदवारांना बसू शकतो. ७०० मते सगळ्याच उमेदवारांसाठी निर्णायक ठरू शकतात.
किसन कथोरे, नरेंद्र पवारांकडून प्रचार
बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती नाही. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादी व मनसेच्या उमेदवारांचा प्रचार केला. समितीवर भाजपाच्या जास्तीतजास्त जागा आणण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे व नरेंद्र पवार यांनी प्रचारावर अधिक भर दिला आहे.
ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. ती पॅनल पद्धतीने होत असून प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार नेमक्या कोणत्या पक्षाचा आहे, हे स्षष्ट होत नाही. मात्र, पॅनल पद्धतीत कोण कोणाचा प्रचार करतो, यावरून त्या उमेदवाराच्या विजयासाठी कोण मेहनत घेत आहे, हे उघड होते.
बाजार समितीवर यापूर्वी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत कथोरे यांनी भाजपाचा झेंडा फडकावला होता. तोच झेंडा पुन्हा फडकावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने राष्ट्रवादीशी छुपी युती केल्याने उमेदवार निवडून आल्यावर कोणत्या पक्षाचा सदस्य सभापतीपदी विराजमान होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.