कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:54 PM2020-03-24T15:54:58+5:302020-03-24T16:01:09+5:30

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद

Kalyan apmc market will be open amid lockdown due to coronavirus | कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

googlenewsNext

कल्याण: राज्यात लॉक डाऊन व संचार बंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला व अन्नधान्य येत असल्याने पणन खात्याच्या आदेशानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. बाजार समिती प्रशासनाने समिती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी होलसेल व्यापारी वर्गाकडून व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेत स्वत:च्या जोखमीवर व्यापार सुरु ठेवावा असे आवाहन केले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यापार बंद करु नये असे आवाहन समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी रिकामी करण्यात येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत वळविला आहे. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवाक नियमित आहे. त्यात घट झालेली नाही असे सचिव चौधरी यांनी सांगितले. बाजार समितीत जवळपास दररोज आठ हजार क्वींटल माल येत आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा नाही. बाजार समितीत शेतमाल व अन्नधान्य हे अत्यावश्यक असल्याने बाजार समिती बंद करु नये असे पणन खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीमधील फूल बाजार व जनावरांचा बाजार 20 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे. 

फूल बाजारात दिवसाला एक कोटी रुपयांची उलाढाल होते. तर जनावरांच्या बाजारात दिवसाला 25 लाख रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल शुक्रवारपासून बंद आहे. त्याचा फटका जनावरांच्या मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांना बसला आहे. बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद करण्यासंदर्भात समिती प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे पत्र दिलेले नाही. बाजार समितीत कोरोनामुळे मनुष्यबळ कमी आहे ही वस्तूस्थिती आहे. बाजार समितीचा सरकारी कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात कामावर हजर आहे.

होलसेल मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, नवी मुंबई बाजार समिती बंद असल्याने त्याठिकाणचा माल याठिकाणी आला आहे. मात्र बाहेरच ग्राहक जास्त प्रमाणात दिसून येत आहे. कोरोनाच्या भितीपोटी बाहेरच्या ग्राहकाला रोखणे व्यापाऱ्यांना शक्य नाही. बाजारात त्यामुळे गर्दी वाढली आहे. होलसेल मालाला उठाव नाही. आवाक चांगली असली तरी उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला त्यांच्या जोखीमेवर त्यांनी व्यापार करावा. त्यांची काळजी घ्यावी. दुकानावर गर्दी झाल्यास ती टाळण्याकरीता दुकान बंद ठेवणे उचित होईल. बरेचसे माथाडी कामगार हे गावाला निघून गेले आहे. त्यामुळे शेतमाल टेम्पो व ट्रकमधून खाली कोण करणार असा प्रश्न आहे.

दरम्यान बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, भाजीपाला व अन्नधान्य ही अत्यावश्यक बाब आहे. पणन खात्याच्या आदेशानुसार बाजार समिती सुरुच राहणार आहे. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटी ग्राहकांनी गर्दी न करता खरेदी विक्री करावी असे आवाहन केले आहे.
 

Web Title: Kalyan apmc market will be open amid lockdown due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.