कल्याण-बदलापूर रस्त्यासाठी आयुक्तांना घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:57 PM2019-06-13T23:57:40+5:302019-06-13T23:57:58+5:30
उल्हासनगर पालिका : चार वर्षांपासून रखडले आहे काम
उल्हासनगर : पुनर्बांधणीविना चार वर्षापासून रखडलेला कल्याण ते बदलापूर रस्त्यासाठी व्यापारी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. बाधित दुकानदारांना पर्यायी जागा दिल्यानंतरच रस्त्याच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे व्यापारी व सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले.
उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रूंदीकरण तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ वर्षापूर्वी झाले. रस्ता रूंदीकरणापूर्वी प्रथम पर्यायी जागा द्या, नंतरच दुकानांवर कारवाई करा अशी भूमिका घेऊन काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याचा अद्यापही निर्णय लागला नाही. न्यायालयात गेलेल्या दुकानादांराना पर्यायी जागा दिल्यावरच, रस्ता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार असल्याची प्रतिक्रीया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली. रस्ता रूंदीकरणात पूर्णत: बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना पालिकेच्या इंदिरा गांधी भाजीमार्केट या ठिकाणी २०० चौरस मीटर व्यापारी गाळे देण्याचा ठराव त्यावेळी महासभेत मंजूर झाला. मात्र पालिकेने कारवाई केली नाही. न्यायालयात पर्यायी जागेसाठी दार ठोठावलेल्या दुकानदारांसोबत सर्वपक्षीय नेते व तत्कालिन आयुक्तांनी बैठक घेऊन रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी न्यायालयातून माघार घेण्याचे आश्वासन व्यापाºयांना दिले होते.
मात्र त्यानंतर पालिकेने पुढाकार घेतलेला नाही. व्यापाºयांसह सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा आयुक्तांना साकडे घातले आहे. शिष्टमंडळामध्ये आयलानी, भाजपचे प्रदेश सचिव प्रकाश माखिजा, गटनेते जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, प्रदीप रामचंदानी तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
२२ कोटी पडून
शहरातून जाणाºया कल्याण-बदलापूर रस्त्यासाठी एमएमआरडीएने २२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती. चार वर्षापासून निधी पडून असून महापालिकेने रस्ता पुनर्बांधणीतील अडसर दूर करण्याचे आदेश एमएमआरडीएने पालिकेला दिले होेते, तसेच निधी परत घेण्याचा इशाराही दिला होता. महापालिकेने पर्यायी जागेसाठी न्यायालयात गेलेल्या व्यापाºयांची वेळीच समजूत काढली नाहीतर हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.