कल्याण खाडी परिसर पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:36+5:302021-07-23T04:24:36+5:30
कल्याण : जोरदार पावसामुळे पश्चिमेतील खाडी परिसर गुरुवारी पाण्याखाली गेला. त्यामुळे तेथील घरे आणि म्हशींच्या गोठ्यांतही पाणी शिरले. दूध ...
कल्याण : जोरदार पावसामुळे पश्चिमेतील खाडी परिसर गुरुवारी पाण्याखाली गेला. त्यामुळे तेथील घरे आणि म्हशींच्या गोठ्यांतही पाणी शिरले. दूध व्यावसायिकांनी सर्व म्हशी गोविंदवाडी बायपास रस्त्यावर आणून बांधल्या होत्या. हजारो म्हशींनी हा रस्ता दोन्ही बाजूने भरल्यामुळे हा बायपास रस्ता की म्हशींचा गोठा, अशी स्थिती निर्माण झाली होती.
खाडीनजीक रेतीबंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर म्हशींचे गोठे आहेत. पावसाचा जोर वाढल्याने त्या गोठ्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे म्हशी पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाली. खाडीच्या पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढत असल्याचे पाहून पहाटेपासून दूध व्यावसायिकांनी त्यांच्या म्हशी गोविंदवाडी बायपासवर आणून बांधल्या. त्यामुळे हा रस्ता म्हशीने भरला होता. २०१९ मधील अतिवृष्टीतही अशीच स्थिती उद्भवली होती. त्यावेळी प्रशासनाने पुन्हा अतिवृष्टी झाल्यास म्हशींचे गोठे अथवा म्हशी अन्यत्र हलवाव्यात, असे आदेश दिले होते. तीच परिस्थिती गुरुवारी पुन्हा उद्भवली आहे.
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी
गोविंदवाडी बायपासवर वाहतूककोंडी झाली होती. दुर्गाडी चौकातही पाणी साचल्याने दुर्गाडी ते बिर्ला काॅलेज रस्त्यावर पाणी साचले होते. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता. शहर आणि वाहतूक पोलीस हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, कल्याण स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या व भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागला.
बाजार समिती पाण्याखाली
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीही पूर्णपणे पाण्याखाली गेली. येथे दररोज १५० ट्रक शेतमाल येतो व जवळपास दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. मात्र, गुरुवारी पावसाचे पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बाजार समितीच्या नजीकचा सगळ्यात मोठा नाला हा ओसंडून वाहू लागल्याने बाजार समिती ते पत्रीपूल दरम्यान कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना ही कोंडी सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.
-----------------------