कल्याण गुन्हे शाखेनं उघड केला १५ लाखांच्या 'दारूचा गोलमाल', गोव्याची दारू उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 09:36 PM2017-11-04T21:36:55+5:302017-11-04T21:37:55+5:30
गोव्याची कमी प्रतीची दारू महाराष्ट्रात आणून इकडे उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना कल्याण गुन्हे शाखेनं अटक केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली
डोंबिवली - गोव्याची कमी प्रतीची दारू महाराष्ट्रात आणून इकडे उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना कल्याण गुन्हे शाखेनं अटक केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दोघांकडून तब्बल ३८० खोके दारू जप्त करण्यात आली आहे. रंजन शेट्टी(४७) बेताडगाव, दिवा पूर्व, आणि हिरामण म्हात्रे, रा. निळजे अशी अटक केलेल्या दोघांची नावं असून डोंबिवली-शिळफाटा रोडवर ते हा धंदा करायचे.
सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे व गुन्हे शाखा कल्याण-३ युनिटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन गुन्हे गोव्याहून बेकायदेशीरपणे हलक्या प्रतीच्या दारूच्या बाटल्या मागवून त्यातली दारू उंची मद्याच्या बाटलीत भरायची आणि त्यांना नवीन पॅकिंगची झाकणं लावून विकायची, अशी या दोघांची कार्यपद्धत होती. यासाठी भंगारवाल्यांकडून ते इम्पिरीयल ब्ल्यू, डिएसपी ब्लॅक, मॅकडॉल्स, रॉयल स्टॅग, बॅगपायपर आदी कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या विकत घ्यायचे. एका कंटेनरमध्ये ते हा गोरखधंदा करायचे. काटईनाका-बदलापूर रोडवरील खोणीगाव कनका हॉटेलमागे ते असा अवैध धंदा करत होते, याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरुन त्यांनी सापळा रचत अटक केली. विशेष म्हणजे ही दारू ते बाजारभावाच्या अर्ध्या किंमतीत विकत असल्यानं त्यांच्याकडून याच भागातले नागरिक हळद अथवा तत्सम कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात दारू विकत घ्यायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत कल्याण गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकत हा धंदा उध्वस्त केला. यावेळी सुमारे १४ लाख २७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यात कंटेनर, दोन कार, दारूचे ३८० बॉक्स आणि उंची मद्याच्या बाटल्यांची ८ हजार नवीन झाकणं पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले. त्या आरोपिंकडे ३ लाख ७७ हजार रोख, तसेच अवैधरित्या आणलेली दारु इम्पिरीयल ब्ल्यू, डिएसपी ब्लॅक, मॅकडॉल्स, रॉयल स्टॅग, बॅगपायपर आदी कंपन्यांच्या बाटल्यांचे बुचन यासह अन्य साधन सामग्री हस्तगत करण्यात आली.