'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 10:08 AM2019-02-06T10:08:46+5:302019-02-06T13:22:21+5:30
कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
डोंबिवली - कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तरुण अपघातात गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, कोपर स्थानकात मंगळवारपासून (5 फेब्रुवारी) भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, आरपीएफ आणि प्रवासी संघटनांचे 'रेल्वे रूळ ओलांडू नका' यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी सकाळीही हे अभियान सुरू असतानाच एका प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी, अशीही मागणी केली जात आहे.
पदर अडकल्याने रेल्वेखाली चिरडून मायलेकासह तिघे ठार
दरम्यान, रविवारीदेखील (3 फेब्रुवारी) रेल्वेखाली चिरडून कल्याण येथील कोळसेवाडीच्या मायलेकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी कोपर रेल्वेरुळावर घडली. कोळसेवाडी येथील 26 वर्षीय प्रीती उदय राणे, तिचा दोन वर्षांचा मुलगा लिवेश आणि कोपर येथील 62 वर्षीय सुनीता भंगाळे यांचा मृत्यू झाला. तर प्रीतीचे 65 वर्षीय सासरे भास्कर चंदू राणे हे जखमी झाले.
(रूळ ओलांडणाऱ्यांना चॉकलेट वाटप, भाजपा, रेल्वे पोलिसांनी राबवली जनजागृती मोहीम)
प्रीती तिचा मुलगा लिवेशला घेऊन सासरे भास्कर राणे यांच्यासोबत दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोपर येथील भंगाळे यांच्या घरी जात होती. त्यांच्या नातलग सुनीता भंगाळे यादेखील सोबत होत्या. त्या वेळी कोपर रेल्वेरूळ ओलांडताना एका रुळावरून जनशताब्दी एक्स्प्रेस तर दुसऱ्या रुळावरून जलद लोकल आली. दोन्हीकडून अचानक रेल्वे आल्याने सुनीता व प्रीती या दोन्ही रुळांच्या मध्ये थांबल्या. त्या वेळी रेल्वेमध्ये सुनीता यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्यांच्यासोबत प्रीती आणि लिवेश हे दोघेही रेल्वेखाली आले.