कल्याण-डोंबिवली, २७ गावांचा परिसर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:12 AM2018-06-26T01:12:03+5:302018-06-26T01:12:06+5:30
कल्याण-डोंबिवलीत रविवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. मागील ४८ तासांमध्ये २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. मागील ४८ तासांमध्ये २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विविध भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबले. काही ठिकाणी दोन फूट तर, काही ठिकाणी कमरे इतके पाणी साचले. नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. लहान गटारांचीही सफाई नीट न झाल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. तर, १३ झाडे पडल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील टिळक चौक ते शिवाजी चौकात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरल्याच्या काही घटना घडल्या. शिवाजी चौक जलमय झाला होता. गुरुदेव हॉटेल शेजारील साई विहार इमारतीच्या आवारात पावसाचे पाणी शिरले होते. गटारातील पाणी रस्त्यावरून वाहिल्याने त्याला ओढ्याचे स्वरूप आले. जिल्हा सत्र न्यायालयाच्या भिंतीला लागून असलेले भेळचे दुकान, कल्याण स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ, पत्रीपूल ते कचोरेकडे जाणारा रस्ता तसेच टाटानाका ते खंबाळपाडा रस्त्यावरील चौधरी कंपाउंड येथे पाणी साचले होते. पत्रीपूल येथील रहेजा इमारतीच्या आवारात पावसामुळे एका झाड पडले. अग्निशमन दलाने ते बाजूला केले.
डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवरील साई लीला इमारतीच्या घराच्या छताचा एक भाग काही अंशी कोसळला. ही घटना गंभीर नसल्याने त्यात कोणला दुखापत झालेली नाही. कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी गावातील राजाराम पाटील नगरीतील सखल भागांत दोन फूट पाणी होते. ग्रामीण भागातील नालेफाईला प्राधान्य द्यावे, अशी मागणी येथील अपक्ष नगरसेवक कुणाल म्हात्रे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने हा परिसर जलमय झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
डोंबिवली ग्रामीण भागालाही पावसाचा जोरदार फटका बसला. कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा येथे साचलेल्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांनी वाट काढली. आजदे, सागाव, सांगर्ली या गावातील सखल भागांतही पावसाचे पाणी साचले.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठाजवळचा परिसर जलमय झाला होता. निवासी भागात सुदर्शनगर, आजदे, मिलापनगर, एम्स रुग्णालय परिसरात पाणी होते. मोबाइल कंपन्यांनी लाइन टाकण्यासाठी एमआयडीसी निवासी विभाग परिसरातील रस्ते खड्डे खोदून ठेवले आहे. पावसाळ्यापूर्वी त्यांनी ते न बुजवल्याने त्यात पाणी साचले. या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी एखाद्या गाडीला अपघात होऊ शकतो, अशी भीती जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या जलमय परिस्थितीविषयी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानामुळे मतदारांना मतदान करता यावे, यासाठी सुट्टीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी उशिरा काढला होता. त्यामुळे शाळांना सुट्टी आहे की नाही, याविषयी पालकवर्गात संभ्रम होता. पावसामुळे काही शाळांनी सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले. तशा सूचना त्यांनी पालकांना दिल्या होत्या.
मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये उडाली झुंबड
म्हारळ : कल्याण ग्रामीण भागातील नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ वळगणीचे मासे पकडण्याचा आनंद घेत आहेत. करवली, मळे, वारशी, शिवरा, आरोळ, वालजी, फोरसिंग, दांडी, मुरी आणि टोळमासा आदी वळगणीचे मासे अंडी घालण्यासाठी शेत, नाले, ओढ्यात येतात. ते पकडण्यासाठी कांबा, रायता परिसरात ग्रामस्थांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.शेतीच्या कामांना आला वेग
टिटवाळा : पावसाच्या हजेरीमुळे नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. कल्याण ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतीची उखळण, मशागत सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरणी केलेल्या भातच्या रोपांवर खत टाकण्यात येत असल्याचे पाहायला मिळते.भरपावसातही मतदानाच्या बुथवर गर्दी
पावसातही अनेक बूथ व पंडालमध्ये कार्यकर्ते मतदारांना त्यांची नावे शोधून देत होते. कल्याणच्या डॉ. आंबेडकर उद्यानात बूथवर एकच गर्दी होती. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमध्ये आले होते. सकाळच्या सत्रात किती मतदान झाले, याची माहिती त्यांना सेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी व शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली.
म्हारळ : पावसाच्या संततधारेमुळे सोमवारी कल्याण-नगर महामार्गावरील शहाड ते म्हारळदरम्यान वाहतूक कोंडी झाली. या परिसरात एमएमआरडीए, उल्हासनगर महापालिका आणि त्यापुढे राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) विभागाचे काम सुरू असल्याने त्याचा फटका बसत आहे. या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने शहाड, बिर्ला गेट, म्हारळ आणि कांबादरम्यान प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवार-रविवारच्या सुट्यांनंतर सोमवारी परतणारे चाकरमानी या कोंडीत अडकून पडले. मुरबाड-गोवेली-टिटवाळा-मोहने-शहाड या मार्गाने त्यांना प्रवास करावा लागला. तर काहींना घरी परतावे लागले. म्हारळ गावातील काही सखल भागातही पाणी शिरले. शहाड ते म्हारळ दरम्यानचा भाग आता एमएमआरडीए आणि उल्हासनगर महापालिका यांच्या हद्दीत येतो. सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने अडचणींचा सामना वाहनचालकांना करावा लागत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एन. ढगे
यांनी सांगितले.