कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:07 AM2020-01-27T11:07:03+5:302020-01-27T11:07:44+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या.
कल्याण - मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना-भाजपा एकमेकांपासून दुरावले आहेत. तर भाजपा-मनसेची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होऊ शकते असं भाकीत कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं आहे.
याबाबत बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, एकमेकांना शिव्या देऊन जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर आम्ही हिंदुत्ववादी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असा टोला गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला ५३, भाजपला ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे नगरसेवक निवडून आले. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. मात्र राज्यातील सत्तास्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय गणित बदललं आहे.
दरम्यान, मुंबईत झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने भाजपाकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं, सीएए समर्थनासाठी राज ठाकरेंकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची बदलेली भूमिका भाजपाच्या फायद्याची ठरत असल्याने भविष्यात मनसे-भाजपा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझोता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली होती. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.