कल्याण डोंबिवली क्राईम सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:06+5:302021-03-08T04:38:06+5:30
कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी भागातील वैकुंठधाम बिल्डिंगमध्ये राहणारे कृष्णमूर्ती अय्यर आणि त्यांच्या घरातील इतर सदस्य त्यांच्या वडिलांच्या कानाच्या उपचारासाठी ...
कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी भागातील वैकुंठधाम बिल्डिंगमध्ये राहणारे कृष्णमूर्ती अय्यर आणि त्यांच्या घरातील इतर सदस्य त्यांच्या वडिलांच्या कानाच्या उपचारासाठी बोरीवलीला त्यांची मावशी मीनाक्षी सुब्रमण्यम यांच्याकडे गेले होते. त्या वेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तीन लाख ८८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २८ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------
सात लाखांचा अपहार
कल्याण : सिटीस्कॅन व एमआरआय सेंटरच्या कॅश बिलांमध्ये फेरफार करून सात लाख ३५ हजार ५८१ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली मॅनेजर विजय सांगळे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मे २०२० ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील एमआरआय सेंटरमध्ये ही फेरफारची घटना घडली असून डॉ. संदेश राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------
उघड्या खिडकीवाटे चोरी
डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा रोडवरील जवाहर दर्शन सोसायटीत तळमजल्यावर राहणारे अभिषेक खेतान यांच्या घराच्या उघड्या खिडकीवाटे आतमध्ये शिरून चोरट्यांनी आईच्या बेडरूममधील सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुुरुवारी मध्यरात्री घडली.
------------------------------------------------
दुचाकी चोरीला
कल्याण : जितेंद्रसिंग भारज यांनी कल्याण पूर्वेला पुणे लिंक रोडवर २६ फेब्रुवारीला रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. या प्रकरणी भारज यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी दुचाकीचोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------------------
एटीएममधील रोकड चोरीला
कल्याण : खडकपाडा परिसरातील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दोघांनी प्रवेश केला. कोणत्या तरी वस्तूने एटीएमच्या कॅश डिस्पेंसर मशीनचे पॅनल बाहेर काढून १८ हजार रुपये चोरून नेले. ही घटना २५ फेब्रुवारीला पहाटे ५ ते ५.३० दरम्यान घडली. या प्रकरणी शुक्रवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------------------
लोखंडी रॉडने मारहाण
डोंबिवली : रणजीत पांडे आणि उमेश पांडे या पुतण्या-काकाला लोखंडी रॉड आणि फायटरने मारहाण केल्याची घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० ला पूर्वेतील पिसवली परिसरात घडली. या प्रकरणी दीपक चौपडे, किशोर शेट्टी व अन्य दोघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------------------------------
सोशल माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट
कल्याण : प्रभू श्रीराम व सीतेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या प्रेम मराठे या फेसबुक होल्डरविरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार करण्यात आली. देवी-देवतांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत पोस्ट करणाऱ्या माथेफिरूवर फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार भाजपच्या कायदा सेलतर्फे करण्यात आली आहे. प्रेम मराठे नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. हे प्रकरण गंभीर असून तातडीने याचा तपास करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. संबंधित व्यक्तीला तातडीने अटक न झाल्यास न्यायालयामार्फत योग्य ती कारवाई करण्याचे पाऊल उचलणार असल्याचे या वेळी ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले.
------------------------------------------------------
फोटो आहे