कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचा फैलाव; पाच महिन्यांत २६० संशयित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:14 AM2019-11-02T00:14:50+5:302019-11-02T00:15:03+5:30

नगरसेवकालाही लागण

Kalyan-Dombivali Dengue prevalence; Five suspected patients in five months | कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचा फैलाव; पाच महिन्यांत २६० संशयित रुग्ण

कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचा फैलाव; पाच महिन्यांत २६० संशयित रुग्ण

Next

अनिकेत घमंडी 

डोंबिवली : नोव्हेंबरला सुरुवात झाली तरीही अधून-मधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण तसेच मधेच वाढणारी उष्णता, अशा खराब हवामानामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. केडीएमसी हद्दीत जून ते आॅक्टोबरदरम्यान डेंग्यूचे २६० संशयित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ऑक्टोबरमध्ये यंदा पाऊस आणि ऊन, असे दमट वातावरण होते. त्यातही आठवडाभरापासून दुपारी वातावरणात अचानक उष्मा तर, सकाळी आणि रात्रीच्या वेळेस काहीसा गारवा जाणवत आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढल्यामुळे टिटवाळा, आंबिवली, शहाड, कल्याण, डोंबिवली परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. सर्वच संशयित रुग्णांना दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची गरज नसली तरी आजार वाढू नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही जनजागृती केली जात आहे.

अस्वच्छता, साचलेले पाणी अशा ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने स्वच्छता विभागाकडून स्वच्छता केली जात असल्याचा दावा करण्यात आला. डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढल्याने या आजारावर कसे नियंत्रण मिळवायचे, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. रुग्ण वाढू नयेत, यासाठी आरोग्य अधिकारी आपल्या पथकासह ठिकठिकाणी पाहणी, जनजागृती करत असल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच ते राहत असलेल्या पेंडसेनगरमधील मैत्री इंदिरासदन सोसायटीत तिघांना डेंग्यू झाला आहे. खासगी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दामले हे सध्या घरीच उपचार घेत आहेत. दामले यांना डेंग्यू झाल्याचे कळताच महापालिकेने त्या परिसरात अन्य रुग्ण आहेत का, याचे सर्वेक्षण केले आहे.

खराब हवामानामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये. तसेच पाणी साठवून ठेवू नका. स्वच्छता राखा. डासांचा प्रार्दुभाव होत असेल तर तातडीने महापालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधावा. धूर फवारणी करून घ्या. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. महापालिकेलाही त्याची माहिती द्या, जेणेकरून खबरदारीच्या उपाययोजना करता येतील. - डॉ. राजू लवंगारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी

डेंग्यू संशयित रुग्ण आढळत असलेल्या परिसरात डासआळी नाशक पावडर तसेच धूरफवारणी आजुबाजूच्या परिसरात तातडीने केली जात आहे. आमचे पथक तेथे स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत होत आहे. धूरफवारणी विविध ठिकाणी सुरूच आहे. पण एखादा रुग्ण आढळल्यास त्याला लागण होण्यामागील कारण काय, हे देखिल पाहणे तेवढेच आवश्यक असते. त्यानुसार आमचे काम सुरू असते.
- विलास जोशी, साहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी

Web Title: Kalyan-Dombivali Dengue prevalence; Five suspected patients in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.