कल्याण, डोंबिवली ‘गॅसवर’
By admin | Published: January 4, 2016 02:00 AM2016-01-04T02:00:23+5:302016-01-04T02:00:23+5:30
येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी हा प्रत्यय पुन्हा एकदा आला. काही दिवसांपूर्वी दिवा येथे डम्पिंगवर रसायने जाळल्याने लोकांना त्रास झाला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर गॅस चेंबर झाले आहे.
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ५५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही या ठिकाणी बेकायदा
कचरा टाकणे सुरूच आहे. याबाबत, सुरू असलेली बेपर्वाई पाहता मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला चांगलेच फटकारले असून एका याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला महापालिकेने आता सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावरील निर्णय प्रलंबित आहे. एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच राहिल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. शनिवारी पुन्हा एकदा या डम्पिंगच्या कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली. ही आग बराच वेळ धुमसत होती. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन
क रावा लागला. बराच वेळ धुमसत असलेल्या या आगीमुळे निर्माण झालेला धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात गेल्याने रहिवाशांचे हाल झाले. हा धूर आधारवाडीसह वाडेघर, लालचौकी, पारनाकापर्यंत पसरला होता. यात रहिवाशांसह पादचाऱ्यांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे लागले. या सतत होणाऱ्या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काहींनी तर या परिसरातून अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी एकदा येऊन परिस्थिती पाहावी, जेणेकरून नागरिकांना होण्याऱ्या त्रासाची जाणीव त्यांना होईल, असा संतापही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. याबाबत, वाडेघर परिसरातील रहिवासी असलेले अजय पाटील म्हणाले धुरकट परिस्थिती ही कायमची असून माझ्या दोन्ही लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होत आहे. धुरामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून येथील जागा सोडून दुसरीकडे जाण्याच्या आम्ही विचारात आहोत.