कल्याण, डोंबिवलीतील तलावांची डबकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:47 AM2018-08-27T04:47:55+5:302018-08-27T04:48:22+5:30

ऐतिहासिक दस्तऐवजात तसेच संपूर्ण कल्याण शहराच्या इतिहासात तलावांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना, तलावांचे शहर म्हणून ठाण्यापाठोपाठ कल्याणचा लौकिक आहे.

Kalyan, Dombivali lake pond | कल्याण, डोंबिवलीतील तलावांची डबकी

कल्याण, डोंबिवलीतील तलावांची डबकी

Next

ठाणे- ऐतिहासिक दस्तऐवजात तसेच संपूर्ण कल्याण शहराच्या इतिहासात तलावांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना, तलावांचे शहर म्हणून ठाण्यापाठोपाठ कल्याणचा लौकिक आहे. मात्र, काळातलाव आणि टिटवाळा महागणपती मंदिर तलावाव्यतिरिक्त अन्य तलावांना अवकळा आली असून त्यांच्या सुशोभीकरणाकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अहवाल, समित्यांची स्थापना, आर्थिक तरतूद आणि पाहणी दौरे याव्यतिरिक्त फारसे काम न झाल्याने बहुतांश तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

शहरी वा ग्रामीण भागात तलाव हे एकेकाळी पाणीपुरवठ्याचे मुख्य स्रोत होते. शहराला लाभलेल्या विस्तीर्ण तलावांमुळे नगरे, त्याजवळ असलेली गावे पूर्वी तलावांचे पट्टे म्हणून ओळखले जात होते. पण, आता तलाव म्हणजे शहरातील डम्पिंग ग्राउंड ठरू लागले आहेत. कल्याणसह डोंबिवलीतील काही तलाव प्रदूषित झाले असून हे पाण्याचे स्रोत टिकवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बांधकामधारकांकडून तलाव गिळंकृत करण्याचे सुरू असलेले प्रकार पाहता एक प्रकारे तलावांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असून या तलावांचे महापालिकेने योग्य प्रकारे संवर्धन केले, तर हे जलस्रोत शहरात कायमस्वरूपी राहतील, अशी भावना जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

तलाव, सरोवर आणि जलाशय ही स्थानिकांची अत्यावश्यक गरज भागवण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात. ही स्थळे स्थलांतरित पक्ष्यांना व पावसाचे पाणी साठवून भूूजल पातळी वाढवणे, जलचर प्राणी व वनस्पती यांची जैवविविधता अबाधित ठेवणे, तसेच जलविहारासारखी मनोरंजनाची स्थळे म्हणून उपयुक्त ठरतात. परंतु, सद्य:स्थितीला या जलसाठ्यांच्या संवर्धनाकडे पाहिजे त्याप्रमाणात स्थानिक पातळीवर लक्ष दिले जात नसल्याने बहुतांश जलाशयांची दुरवस्था झालेली आहे.

ठाणे हा तसा तलावांचा जिल्हा. जिल्ह्यातील अनेक शहरांचे सौंदर्य वाढवले ते या तलावांनीच. ठाणे शहर असो वा कल्याण-डोंबिवली, येथील तलाव हे या शहरांची शान असल्याचे बोलले जाते. परंतु, कल्याण- डोंबिवलीबाबत मात्र येथील तलाव हे शहरांची कधीकाळी शान होते, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. कल्याण शहरातील ऐतिहासिक काळातलाव आणि टिटवाळ्यातील गणपती मंदिर तलाव वगळता इतर तलावांची अवस्था पाहता याची प्रचीती येते. शहराचे वैभव असलेले काळातलाव असो अथवा गणपती मंदिर तलाव परिसरात फेरफटका मारणे एक वेगळाच अनुभव देऊन जातोे. मात्र, अन्य तलावांबाबत प्लास्टिक पिशव्या, कचरा, निर्माल्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणारे एकमेव स्रोत म्हणजे उल्हास नदीचे खोरे. याव्यतिरिक्त शहराला अन्य कोणताही पाणीपुरवठा करणारा स्रोत नाही.

२०११ च्या जनगणनेनुसार केडीएमसी क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ इतकी आहे. त्यात १ जून २०१५ ला नवीन २७ गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाल्याने ही लोकसंख्या आजमितीला १५ लाखांहून अधिक झाली आहे. केडीएमसी क्षेत्राचे वेगाने होत असलेले शहरीकरण तसेच वाढती लोकसंख्या पाहता पुढील काही वर्षांतच लोकसंख्या २० ते २२ लाखांच्या घरात पोहोचेल, असा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता केडीएमसीने उपलब्ध जलस्रोतांचा विचार करणे, ही काळाची गरज आहे. नवी मुंबई पालिकेने राज्य सरकारकडून मोरबे धरण ताब्यात घेऊन शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडवून घेतला आहे. येणाऱ्या काळात लोकसंख्या वाढली, उद्योग वाढले तरी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी व्यवस्था मोरबे धरणाच्या माध्यमातून येथील व्यवस्थेने करून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीनेही या आघाडीवर अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे.

महापालिकेच्या हद्दीत ४२ तलाव आहेत. पूर्वी ही संख्या ३० च्या आसपास होती. परंतु, २७ गावांचा समावेश झाल्याने तलावांच्या संख्येत वाढ झाली आहे. या तलावांचा आढावा घेता महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार कल्याणमधील अ प्रभागात आठ, ब प्रभागात चार, क प्रभागामध्ये सहा, ड प्रभागातील शहरी भागात चार, तर ग्रामीण भागामध्ये चार, डोंबिवली ग्रामीण भागातील ई प्रभागात सर्वाधिक ११, फ प्रभागात दोन, ग मध्ये २, तर ह प्रभागात १ तलाव आहे. या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यापूर्वीही वारंवार अधोरेखित झाली आहे.
कल्याण ऐतिहासिक शहर असून इतिहासकाळात हे तलाव बांधण्यात आले आहेत. या तलावातील पाण्याचा परिसरातील रहिवासी वापरही करत होते. कल्याणमध्ये तबेले मोठ्या प्रमाणात आहेत. या तबेलेमालकांकडूनही तलावांचा वापर होत होता. मात्र, जसजसे कल्याण शहर वाढू लागले, तसतशा नवीन वसाहती उभ्या राहू लागल्या. हक्काचे पाण्याचे साधन म्हणून सोसायट्यांमध्ये बोअरिंग खोदण्यात आले. त्यांची संख्या वाढली. नागरिकीकरण होत गेले, तसे महापालिकेकडून नागरी वस्तीला करण्यात येणाºया पाणीपुरवठ्यात वाढ करण्यात आली. पाणीपुरवठ्याचे पर्यायी जलस्रोत उपलब्ध होऊ लागले, तसतसा हळूहळू तलावांचा वापर नागरिकांकडून कमी होऊ लागला. तलावांचा वापर कमी झाल्याने हे तलाव हळूहळू गाळ, मातीने भरून गेले.

झुडुपांची वाढ झाल्याने हे तलाव आहे की माळरान, अशी काही तलावांची अवस्था झाली आहे. काळातलावाचा अपवाद सोडला तर कल्याणमध्ये तलावांची अवस्था बिकट झाली आहे. काळातलाव हे कल्याण शहराचे भूषण आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण झालेच पाहिजे, असा ध्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. ज्याज्यावेळी शिवसेनाप्रमुख कल्याणमध्ये येत, त्यात्यावेळी ते स्वत: या तलावाच्या प्रगतीचा आढावा घेत होते. शिवसेनाप्रमुखांच्या १० ते १२ वर्षांच्या रेट्यामुळे काळातलावाचे सुशोभीकरण पूर्ण झाले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तलावाचा नागरिक शतपावली, मनोरंजन, विरंगुळ्यासाठी मनसोक्त लाभ घेतात. शिवसेनाप्रमुखांनी मनावर घेतले नसते, तर काळातलावही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असता. चारही बाजूंनी या तलावात भराव टाकून बांधकामे करून तलावाची जागा हडप करण्याचे प्रयत्न चालले होते. पण, ते प्रयत्न सुशोभीकरणामुळे थांबले. काही वर्षांपूर्वी काळातलावाप्रमाणे उंबर्डे तलाव, गौरीपाडा, रहाटाळे, सापाड, आधारवाडी, भटाळे, चोळे (डोंबिवली) तलावांचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठवला होता. या सुशोभीकरणाच्या कामासाठी सुमारे ३० कोटी खर्च येणार होता. यात काही तलावांना सुशोभीकरणाचा टच देण्यात आला. पण, केवळ संरक्षक कठडे आणि गाळ काढण्यापुरतीच ही कार्यवाही मर्यादित राहिली. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सत्ताधाºयांची अनास्था यामध्ये बहुतांश तलाव दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहेत. विशेष बाब म्हणजे क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या ऐतिहासिक पोखरण तलावाच्या सुशोभीकरणाकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. श्रेयवादात याचा विकास रखडल्याचे बोलले जाते. या तलावात डिसेंबरपर्यंत पाण्याचा साठा असतो. या हजारो चौरस मीटरच्या तलावात अनेक वर्षांपासूनचा गाळ होता. हा गाळ काढण्याव्यतिरिक्त कोणतेही काम करण्यात आलेले नाही. तलावांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रतिवर्षी आर्थिक निधीची तरतूद केली जाते; परंतु ही तरतूद अंमलबजावणीअभावी कागदावरच राहत आहे.

कार्यवाहीच्या नावाने बोंब
यंदाच्या अर्थसंकल्पात डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगर (गणपती) तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. या तलावाचे सुशोभीकरण करून आबालवृद्धांना तिथे करमणुकीचे ठिकाण उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. परंतु, आजमितीला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही यासंदर्भातील कोणतीही कार्यवाही पुढे सरकलेली नाही.

नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे गरजेचे
तलाव हे नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत, ते कृत्रिम नाहीत. त्यांना नैसर्गिक झरे आहेत. तुम्ही पाण्याचा कितीही उपसा केला, तरी पाण्याची भर पडत राहते. निसर्गत: मिळाले ते टिकवणे आपले कर्तव्य आहे. परंतु, हे जलस्रोत आपण प्रदूषित करत आहोत. घरात नको असलेल्या वस्तू तलावात टाकल्या जातात. निर्माल्यासह मूर्र्ती, फोटो, धार्मिक पुस्तके तलावात टाकली जातात.

बहुतांश तलावांमधील पाण्यावर सद्य:स्थितीला हिरवा थर दिसून येतो. याचा अर्थ तो तलाव आजारी आहे. या हिरव्या थरामुळे तलावामधील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. तलावात टाकले जाणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, कचरा यामुळे ही हिरव्या थराची परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

तलावांच्या बकालतेला नागरिकच कारणीभूत ठरतात. महापालिकेने त्यांच्या अखत्यारितील तलावांमध्ये अशा प्रकारे नागरिकांकडून कचरा टाकला जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात येणार नाही, यासाठी नागरिकांनीही तलावांचे प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी बाळगली पाहिजे, असे मत पर्यावरण अभ्यासक मंडळ प्रकल्प समन्वयक रूपाली शाईवाले यांनी मांडले.

अहवालातील आक्षेपांकडे दुर्लक्ष
कल्याणमधील उंबर्डे तलावाचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, एकूणच अनुभव पाहता, या तलावाचा विकास होईल का, याबाबत मात्र साशंकता आहे. विशेष बाब म्हणजे केडीएमसी दरवर्षी पर्यावरण अहवाल सादर क रते. २०१७-१८ चा अहवाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही.

२०१६-१७ च्या अहवालात तलावांच्या सद्य:स्थितीकडे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यापूर्वीच्या अहवालातही नोंदवलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष झाल्याने एकंदरीतच हे अहवाल केवळ औपचारिकता म्हणून जाहीर केले जातात का, असाही सवाल उपस्थित होतो.

Web Title: Kalyan, Dombivali lake pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.